

यवतमाळ : आर्णी पोलिस ठाणे हद्दीतील धानोरा तांडा येथे आर्णी, दारव्हा व यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गांजाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात आज मंगळवार दि. २८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता च्या सुमारास धाड टाकली. या कारवाईत २ लाख ९४ हजार रुपये किमतीची तब्बल ११३ गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे.
प्रदीप पांडू आडे (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रदीपने त्याच्या शेतात कापूस व तुरीच्या ओळीत गांजाची लागवड केली होती. याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे यवतमाळ, दारव्हा, आर्णी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त
धाड टाकून कारवाई केली. यामध्ये आरोपी प्रदीपच्या शेतात कापूस व तुरीच्या ओळीत ११३ गांजाची झाडे आढळून आली. आरोपीला अटक करून आर्णी पोलिसांच्या स्वाधीन करून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक संतोष मनवर, सहायक पोलीस निरीक्षक पवन राठोड, योगेश गटलेवार, मिथुन जाधव,अजय डोळे, सोहेल मिर्झा, निलेश राठोड किशोर झेंडेकर, अमित झेंडेकर, अशोक टेकाळे आदीनी केली.
१५ दिवसात दुसरी कारवाई
महागाव तालुक्यातील नगरवाडी शेतशिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ दिवसांपूर्वी धाड टाकून कापूस पिकाआड गांजा लागवडीचा पर्दाफाश केला. १ लाख ८७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली होती.