

Youth murder in Ganori village Yavatmal
यवतमाळ : सासुरवाडीत जाऊन चुगल्या केल्याने तरुणाच्या डोक्यात राफ्टरने प्रहार करून त्याचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री बाभूळगाव तालुक्यातील गणोरी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
भारत वामन ठाकरे (वय ३५, रा. गणोरी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तर रामदास शंकर माकोडे (वय ४५, रा. गणोरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रामदास माकोडे हा आपल्या सासुरवाडीत जाऊन चुगल्या लावतो, त्यामुळे सासुरवाडीत आपली किंमत कमी झाली असे, आरोपी भारतला वाटत होते. त्यातूनच त्याने रामदासशी वाद घातला होता. तू जिवंत राहिला, तर यापुढेही मला सासुरवाडीत अपमानित व्हावे लागेल, अशी धमकी दिली होती. त्यानंतर आरोपीने शुक्रवारी रात्री रामदासच्या घरात घुसून लाकडी राफ्टरने त्याच्या डोक्यावर प्रहार केले. यात रामदास यांचा मेंदू बाहेर पडून तो जागीच ठार झाला.
या घटनेची माहिती मिळताच बाभूळगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठले. आरोपी भारतला अटक करून खुनाचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक एल. डी. तावरे करीत आहेत.