

यवतमाळ : वणी शहरात घडलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत छडा लावला. अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
स्वप्नील किशोर राऊत (वय २६, रा. वणी) असे मृताचे नाव आहे. दि. २३ ऑक्टोबरला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. ठेकेदाराकडून पैसे आणायचे असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला. सायंकाळी पत्नीने फोन केला असता लवकरच घरी येतो असे सांगितले. यानंतर मात्र, रात्री ८ वाजता स्वप्नीलचा फोन बंद होता आणि तो घरी परतला नाही. दि.२४ ऑक्टोबरला सकाळी ६ वाजता कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गजानन नगरी, वडगाव टीप रोड, वणी येथे एका मृतदेहाचा फोटो पाहिला असता तो स्वप्नीलचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाचा मोठा भाऊ चेतन राऊत यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता स्वप्नीलचा मृतदेह गळा व डोक्याला गंभीर मार लागलेल्या अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आढळला.
अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्र व दगडाने मारहाण करून स्वप्नीलची हत्या केल्याची तक्रार चेतन राऊत याने २५ ऑक्टोबरला वणी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात आणि पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने वणी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तपणे या गुन्ह्याचा तपास केला. या पथकाने मृतकाच्या शेवटच्या हालचालींचा मागोवा घेतला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे दि. २३ ऑक्टोबरला एका लाल रंगाच्या दुचाकीवर तो दोन व्यक्तींसोबत जाताना दिसला. या दुचाकीच्या मालकाची माहिती मिळवून, त्या दिशेने तपास सुरू करण्यात आला.
सखोल तपास आणि चौकशीअंती पोलिसांनी वणी तालुक्यातील वडजापूर येथील सुमेश रमेश टेकाम (वय २४) व सौरभ मारोती आत्रम (वय २७) दोन मुख्य आरोपींना अटक केली आहे. आरोपींच्या चौकशीत ही हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे उघडकीस आले आहे. वणी पोलिसांनी वेगाने तपास करून या गंभीर गुन्ह्याची उकल केली.