

Buddha Purnima wildlife count
यवतमाळ : दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात, निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यासाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत पांढरकवडा वन्यजीव विभागातील टिपेश्वर व पैनगंगा अभयारण्यात सोमवार दि. १२ मे रोजी राबविण्यात येत आहे. यावेळी पर्यटकांना रात्रीच्यावेळी मचानीवर वन्यप्राणी दर्शनाचा अनुभव घेता येणार आहे. वन्यप्रेमींना निसर्ग अनुभव घेता यावा, यासाठी ४७ मचानीची व्यवस्था करण्यात आली. वन्यप्राणी गणना करण्यासाठी वनाधिकारी, वनपाल, वनरक्षक, कर्मचारी, निसर्गप्रेमी, पक्षी मित्र यांचा समावेश असणार आहे.
वर्षभरात जंगलातील प्राण्यांच्या संख्येत झालेली वाढ, घट, एखादा नवीन प्राणी दाखल झाला आहे का? आदींच्या नोंदी घेण्यासाठी वनविभागातर्फे दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या रात्री अभयारण्यांत प्रत्यक्ष पाणवठ्याशेजारी मचाणावर बसून वन्यप्राण्यांची मोजणी केली जाते. यासाठी वन विभाकडून पाणी उपलब्ध असलेल्या पाणवठ्याची यादी करण्यात येते. जंगलातील पाणवठ्यानुसार त्याचे विभाग निश्चित केले जातात. प्रत्येक पाणवठ्यावर एक मचाण उभारतात. एका मचाणावर एक वन कर्मचारी आणि एक प्राणीप्रेमी असतो. प्राण्यांच्या नकळत दुपारी तीन ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सलग गणना सुरू राहते.
पाणवठ्यावर येणाऱ्या प्रत्येक प्राण्याचा प्रकार नर किंवा मादी आणि वेळ याची नोंद घेतली जाते. पांढरकवडा वन्यजीव विभागात 'निसर्ग अनुभव' साठी टिपेश्वर अभयारण्यात सुन्ना पर्यटन गेट, माथनी पर्यटन गेट तर पैनगंगा अभयारण्यात खरबी पर्यटन गेट, बिटरगाव, सोनदाभी व कोरटा हे बोर्डिंग पॉईंट निश्चित करण्यात आले आहे. याठिकाणी मचानीची एकूण संख्या ४७ निश्चित करण्यात आली. बोर्डिंग पॉईंटवर सहभागी झालेल्या निसर्ग प्रेमींचे आगमन झाल्यानंतर क्रमवार नोंदणी केली जाणार आहे.
त्यानंतर क्रमवार नोंदणीनुसार ईश्वर चिठ्ठीद्वारे मचानचे वाटप केले जाणार आहे. निसर्ग प्रेमी करिता १२ मे रोजीचे दुपारी आणि रात्रीचे जेवण, पिण्याचे पाणी उपलब्ध केले जाणार आहे. मंगळवार दि. १३ मे रोजी सकाळी अल्पोपहारची व्यवस्था केली जाणार आहे.
वन्यप्राणी गणना करण्याकरिता वनाधिकारी, वनपाल, वनरक्षक, कर्मचारी, निसर्गप्रेमी, पक्षीमित्र यांचा समावेश असणार आहे. व्यन्य प्राणीगणना पूर्ण झाल्यानंतर निसर्ग अनुभव उपक्रमाचा अहवाल, समाविष्ट कर्मचारी, निसर्गप्रेमी यांच्या संख्येसह १५ मे पर्यत कार्यालयात सादर करण्यात येणार आहे.
जणगनना करताना जंगलात असलेले नैसर्गिक तळे, मानवनिर्मित पाणवठे, पाझर तलाव, बेंबळा प्रकल्प, चापडोह, निळोना अशासारख्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या ठिकाणी वन्यप्राण्यांच्या मोजणीसाठी वनपरिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक, वनपाल,असंख्य वनमजूर, हंगामी वनमजूर आदी या मोजणी प्रक्रियेत असणार आहेत.