

Yavatmal Rice Truck Seized
यवतमाळ : शासनातर्फे रेशनच्या दुकानात वितरित करणारा तांदूळ अवैधरित्या काळा बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना ट्रक पकडला. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून ट्रक सह तांदूळ असा एकूण ५७ लाख ६४ हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मनदेव घाटामध्ये केली.
शेख मोहसीन शेख कादर (३४) रा. देऊरबाडो पुनर्वसन, हाफौज बेग सनाऊल्ला बेग (३४) रा.बारभाई मोहल्ला, दिग्रस असे अटकेतील दोघांची नावे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक खाजगी वाहनाने पेट्रोलींग करीत असतांना गोपनीय माहीती मिळाली की, ट्रक क्र. एम.एच २९ बी.ई ८५३२ मध्ये शासनाकडून वितरीत करण्यात येणारा रेशन दुकानाच्या तांदूळाची हेराफेरी करुन अवैधरित्या खुल्या बाजारात विक्री करण्याकरीता आर्णी यवतमाळ मार्गे गोंदिया येथे जात आहे.
या माहितीवरुन क्षणाचाही विलंब न करता स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रवाना झाले. दरम्यान मनदेव घाटात संबधीत ट्रक मिळून आला. त्यानंतर ट्रकमधील संबधीत दोघांची चौकशी केली. तसेच त्यांना विश्वासात घेऊन ट्रकमधील तांदळाची विचारपूस केली, तेव्हा त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाही, तसेच त्यांचेकडे तांदुळासंबंधाने वैध कागदपत्रे आढळून आली नाही. त्यावरुन पोलिसांनी पंचनामा करुन ट्रकसह तांदूळ जप्त केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, पीयुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांच्या मार्गदर्शनात संतोष मनवर, योगेश गटलेवार, अजय डोळे, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, निलेश राठोड, रितुराज मेडवे, आकाश सहारे,स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली.