

Nilgai Hunting In Yawatmal
यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील टीपेश्वर अभ्यारण्या अंतर्गत येणाऱ्या सावंगी बीट कक्ष क्रमांक १२७ च्या जवळील सावरगाव शिवारात निलगायीची शिकार करण्यात आली. वनविभागाच्या पथकाने शिकार करणा-या दोन आरोपींना अटक केली.
नारायण नामदेव गाउत्रे व सुभाष अमृत भंडारे दोघेही रा. सावरगाव अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. शनिवार दि. ३ मे रोजी रात्री टिपेश्वर अभयारण्याचे कर्मचारी शशांक सोनटक्के, क्षेत्र सहाय्यक माथनी वर्तुळ, दिगंबर पोटे वनरक्षक बोथ नियतक्षेत्र व अनिकेत चव्हाण वनरक्षक, भाडउमरी नियतक्षेत्र, हे रात्रगस्त करत होते. अशातच शनिवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास वन्यजीव विभागातील सावंगी बीट कक्ष क्रमांक १२७ च्या जवळील प्रादेशिक विभागाच्या शेत शिवारात बॅटरीचे व मोटरसायकलचे लाईट दिसले. यावेळी कर्मचारी हे शेती क्षेत्राकडे निघाले.
कोणीतरी आपल्याकडे येत आहे हे पाहून आरोपींनी पळ काढला. यावेळी नीलगाय या वन्य प्राण्याचे मोठे तुकडे व काही मांसाचे तुकडे साडीच्या कापडामध्ये गुंडाळलेले आढळून आले. नारायण गाउत्रे व सुभाष भंडारे रा. यांना निलगायचे मांस कपड्यात गुंडाळून प्लास्टिकच्या बोरीत नेत असताना पकडण्यात आले. गट क्रमांक १२९ मधील शेती परिसराची छाननी केली असता विहिरीजवळ निलगायचे मांस, निलगायचे शीर तसेच ताराचा गुंडाळा आदी मुद्देमाल आढळून आला. यावेळी एकूण ६ मोटरसायकल जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी आरोपींविरुद्ध वन गुन्हा नोंदविण्यात आला. आरोपींना घाटंजी येथी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करून सखोल चौकशी करण्याकरिता आरोपींची वन कोठडी मागण्यात आली आहे.
ही कारवाई एम. आदर्श रेड्डी, वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती व विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक रवींद्र कोंडावार, वनक्षेत्रपाल प्रशांत सोनुले, वनपाल शशांक सोनटक्के, वनरक्षक दिगंबर पोटे व वनरक्षक अनिकेत चव्हाण यांनी पार पाडली.
टिपेश्वर अभयारण्याच्या सीमेवरील शेती भागात शिकारी सदृश्य हालचाली आढळून आल्यास शेतकरी व नागरिकांनी तात्काळ वन्यजीव विभागास माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यांचे नाव व ओळख गुप्त ठेवण्यात येईल. या प्रकरणी सर्वांनी वन्यजीव विभागास सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय वन अधिकारी उत्तम फड यांनी केले आहे.