

यवतमाळ : शहरातील अवधूतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेश रमेशराव रणधीर यांना एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आज शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली. उसने दिलेले पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात रणधीर यांनी लाचेची मागणी केली होती. या कारवाईमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदाराने आपल्या एका मित्राला दुसऱ्या मित्राकडून १० लाख रुपये सहा महिन्यांसाठी मिळवून दिले होते. मात्र, मुदत संपल्यानंतरही संबंधित मित्राने पैसे परत केले नाहीत. याप्रकरणी तक्रारदाराने दि. १० डिसेंबर रोजी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन पैसे परत मिळवून देण्याच्या मोबदल्यात पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
तक्रारदाराने याप्रकरणी अमरावती एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली. आज शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत रणधीर यांनी ३ लाख रुपये स्वीकारण्याचे मान्य केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज दुपारी अवधूतवाडी पोलीस ठाण्यातील आपल्याच दालनात लाचेचा पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.
त्यांच्याविरुद्ध अवधूतवाडी पोलीस ठाण्यातच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही धडक कारवाई अमरावती परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुनील किनगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चित्रा मेसरे, स्वप्निल निराळे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.