यवतमाळ : स्मशानभुमीच्या सुशोभिकरणाचे देयक काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या बांधकाम उप अभियंत्यास दहा हजारांची लाच घेताना बुधवारी (दि.१६) रंगेहाथ अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आर्णी येथे आज बुधवारी ही कारवाई केली. संतोष भगवानराव क्षिरसागर ( वय ५३) असे अटक केलेल्या उप अभियंत्यांचे नाव आहे.
यातील तक्रारदार हे सरपंच आहे. त्यांनी त्यांचे गावात स्मशानभुमीचे सुशोभिकरणाचे काम पुर्ण केले होते. सदर कामाचे देयक काढण्यासाठी काम पुर्ण झाल्याच्या प्रमाणपत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्णी येथील उप अभियंत्याची भेट घेतली. मात्र उप अभियंत्याने १० लाखांच्या मंजूर रकमेच्या २ टक्के प्रमाणे २० हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत १४ जुलै रोजी तक्रार केली. यानंतर लाचेच्या मागणीची पडताळणी १५ जुलै रोजी केली असता तडजोडीअंती १ टक्का म्हणजे १० हजार रुपये रक्कम स्विकारण्यास सहमती दर्शविली. त्यानुसार आज बुधवारी दुपारी आर्णी येथील शासकीय कार्यालयात सापळा रचण्यात आला. उप अभियंता संतोष क्षिरसागर यांनी त्यांचा खाजगी चालक सागर शंकरराव भारती (वय २७) याच्यामार्फत लाच घेताना दोघांनाही रंगेहाथ अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक मनोज ओरके करीत आहेत.