

Arni Drug Raid
यवतमाळ : ढाब्यावर अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे रात्रीच्या सुमारास पथकाने छापा टाकला. दोघांना ताब्यात घेत त्यांच्याकडून सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आर्णी तालुक्यातील नागपूर-तुळजापूर महामार्गावरील सुकळी शेतशिवारातील दशमेश पंजाबी ढाब्यावर ही कारवाई करण्यात आली.
सरबजितसिंग उर्फे करण भुट्टासिंग ढिलोन (वय ३७), जगिरसिंग मुख्त्यारसिंग सिंधू (वय ५४) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक लाख ८१ हजार ५०० रुपये किमतीचा १८ किलो १५ ग्रॅम हेरॉइन (चिट्टा) व एक लाख ३८ हजार ६०५ रुपये किमतीचा २७ किलो ७२१ ग्रॅम डोडा पावडर तसेच इतर साहित्य, असा एकूण तीन लाख ३५ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांनी आर्णी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. शासकीय पंच म्हणून आर्णीचे तालुका कृषी अधिकारी आनंद बदखल, नायब तहसीलदार डॉ. संतोष आदमूलवाड होते. या घटनेचा पुढील तपास एपीआय प्रशांत देशमुख करीत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता शनिवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.