Yavatmal Accident : नातवाला वाचविण्यासाठी गेलेल्या आजोबाचा मृत्यू

Yavatmal Accident : नातवाला वाचविण्यासाठी  गेलेल्या आजोबाचा मृत्यू
File Photo
Published on
Updated on

यवतमाळ : नातवाचे प्राण वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या एका आजोबांच्या मृत्यूने आर्णी शहरावर शोककळा पसरली आहे. भरधाव दुचाकीपासून नातवाला वाचवताना झालेल्या भीषण अपघातात अशोक दामोदर भेंडे (वय ६५) या वृद्धाचा मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना दाभडी-बोरगाव मार्गावर मंगळवारी रात्री घडली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, आर्णी येथील रहिवासी असलेले अशोक भेंडे हे नेहमीप्रमाणे आपला नातू आन्वीन याला घेऊन घरासमोरील हनुमान मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना चिमुकला आन्वीन खेळता-खेळता रस्त्याच्या दिशेने गेला. त्याच वेळी समोरून एक भरधाव दुचाकी येत असल्याचे अशोक यांच्या लक्षात आले.

नातवाला ढकलले, स्वतः धडक सोसली

काळाप्रमाणे धावून येणारी ती दुचाकी नातवाला धडकणार, हे पाहताच अशोक भेंडे यांनी क्षणाचाही विलंब न लावता नातवाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी नातवाला सुरक्षित बाजूला ढकलले, मात्र स्वतःला सावरण्यापूर्वीच भरधाव दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, अशोक भेंडे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघातात दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला.

उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली

अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी दोघांनाही तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळला हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान अशोक भेंडे यांची प्राणज्योत मालवली. जखमी दुचाकीस्वाराची प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे.

बुधवारी शोकाकुल वातावरणात अशोक भेंडे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नातवाला मृत्यूच्या दाढेतून ओढून काढणाऱ्या या आजोबांच्या जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news