Tiger Migration : विदर्भातील वाघांची अधिवासाच्या शोधात मराठवाड्यात भ्रमंती! एका वाघाचा तीन हजार किलोमीटरचा प्रवास

महाराष्ट्रासह तेलंगणातील विविध वनक्षेत्रे, शेतीचे प्रदेश आणि मानवी वस्त्यांलगतच्या भागांतून प्रवास
Vidarbha Tiger Marathwada Migration
प्रतीकात्मक छायाचित्रAI-generated image
Published on: 
Updated on: 

Vidarbha Tiger Marathwada Migration

प्रशांत भागवत, उमरखेड : टिपेश्वर अभयारण्यातील वाघांनी नैसर्गिक अधिवासाच्या शोधात वनक्षेत्रांच्या सीमा ओलांडत पैनगंगा अभयारण्यापासून तेलंगणा आणि मराठवाड्यापर्यंत मजल मारल्याच्या नोंदी समोर आल्या आहेत. काही वाघांनी नवीन अधिवास स्वीकारून तेथे आपले क्षेत्र निश्चित केले, तर काहींचा प्रवास अनेक वर्षांनंतरही सुरूच आहे. वाघांच्या या भ्रमंतीतून टिपेश्वर हे वाघांच्या संख्यावाढीसाठी महत्त्वाचे स्रोत क्षेत्र ठरत असल्याचे दिसते. त्याचवेळी पैनगंगा आणि इतर वनक्षेत्रांना जोडणाऱ्या नैसर्गिक वन्यजीव मार्गिकांचे महत्त्वही अधोरेखित झाले आहे.

गौताळा अभयारण्यात संचार करीत असलेला वाघ
गौताळा अभयारण्यात संचार करीत असलेला वाघ

तब्‍बल तीन हजार किलोमीटर प्रवास

टिपेश्वरमधून बाहेर पडलेल्या वाघांच्या स्थलांतराचा अभ्यास करताना २०१९ मधील टी-१-सी-१ या नर वाघाचा प्रवास विशेष लक्षवेधी ठरतो. रेडिओ कॉलरच्या साहाय्याने त्याच्या हालचालींचे निरीक्षण करण्यात आले होते. जून २०१९ मध्ये टिपेश्वर अभयारण्य सोडलेल्या या वाघाने महाराष्ट्र आणि तेलंगणातील विविध वनक्षेत्रे, शेतीचे प्रदेश आणि मानवी वस्त्यांलगतच्या भागांतून प्रवास केला. पैनगंगा अभयारण्यासह अनेक वनक्षेत्रांतून मार्गक्रमण करत अखेर बुलढाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात त्याने आपला अधिवास निश्चित केला. त्याच्या एकूण प्रवासाचे अंतर सुमारे तीन हजार किलोमीटर नोंदविण्यात आले. या घटनेने वाघांच्या नैसर्गिक स्थलांतराचा आवाका स्पष्ट केला.

Vidarbha Tiger Marathwada Migration
Chandrapur Tiger Attack : चंद्रपूर जिल्हा हादरला! सलग दुसऱ्या दिवशीही वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

पैनगंगा परिसर वाघांच्‍या स्‍थलांतरासाठी अनुकूल

पैनगंगा अभयारण्याच्या दृष्टीनेही टिपेश्वरमधून आलेल्या वाघांची उपस्थिती महत्त्वाची ठरली. मे २०२० मध्ये जॉनी (PNGT-1) हा नर वाघ, तर मार्च २०२१ मध्ये PNGT-2 ही वाघीण पैनगंगा अभयारण्यात दाखल झाली. दोघांनीही या क्षेत्राला आपला अधिवास बनवल्याची नोंद २०२२ मध्ये प्रसिद्ध झाली. पैनगंगा परिसरातील भक्ष्याची उपलब्धता आणि वनक्षेत्रांना जोडणाऱ्या मार्गिका या वाघांच्या स्थलांतरासाठी अनुकूल ठरत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी नमूद केले होते. दरम्यान, टिपेश्वरमधून बाहेर पडलेल्या वाघांची भ्रमंती केवळ पैनगंगा किंवा विदर्भापुरती मर्यादित राहिलेली नाही.

थेट धाराशिवपर्यंत मजल

२०२३ मध्ये टिपेश्वरमधून निघालेल्या एका तरुण नर वाघाने सुमारे ४५० किलोमीटरचा प्रवास करून धाराशिव जिल्ह्यातील येडशी रामलिंग घाट अभयारण्यात आपले क्षेत्र निश्चित केले. कॅमेरा ट्रॅपमधील छायाचित्रांची टिपेश्वरमधील जुन्या छायाचित्रांशी तुलना करून त्याची ओळख पटविण्यात आली.

Vidarbha Tiger Marathwada Migration
Gadchiroli Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार!

मराठवाड्यातील छोट्या अभयारण्यात वाघाने अधिवासाला विशेष महत्त्‍व

मराठवाड्यातील या छोट्या अभयारण्यात वाघाने अधिवास निर्माण केल्याची घटना विशेष महत्त्वाची मानली गेली. मात्र, या अभयारण्याचे क्षेत्र मर्यादित असल्याने हा वाघ आजूबाजूच्या भागांतही वावरत असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले होते. बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांतील त्याच्या हालचालींच्या नोंदी समोर आल्या आहेत. हा वाघ मागील दोन वर्षांपासून कायमस्वरूपी अधिवासाच्या शोधात या विस्तीर्ण क्षेत्रात फिरत आहे. येडशी रामलिंग परिसर हा त्याच्या भ्रमंतीतील महत्त्वाचा टप्पा ठरला असला, तरी त्याचा वावर केवळ त्या अभयारण्यापुरता मर्यादित नाही.

काही वाघ दीर्घकाळ विविध वनक्षेत्रांतून भ्रमंती करीत राहतात

या सर्व घटनांकडे पाहताना एक महत्त्वाची बाब लक्षात येते. एखादा वाघ एखाद्या वनक्षेत्रात दिसणे आणि तेथे कायमस्वरूपी स्थिरावणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नवीन अधिवासात स्थिरावण्यासाठी पुरेशी जागा, भक्ष्याची उपलब्धता आणि प्रजननासाठी जोडीदार मिळणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात. त्यामुळे काही वाघ नवीन क्षेत्रात आपला अधिवास निश्चित करतात, तर काही वाघ दीर्घकाळ विविध वनक्षेत्रांतून भ्रमंती करीत राहतात.

धाराशिव जिल्‍ह्यात येडशीजवळ कॅमेर्‍यात कैद झालेला वाघ.
धाराशिव जिल्‍ह्यात येडशीजवळ कॅमेर्‍यात कैद झालेला वाघ.

एक वाघ गौताळा अभयारण्यात स्‍थिरावला

या अभयारण्यातील एक वाघ संभाजीनगरजवळील गौताळा अभयारण्यात स्‍थिरावला आहे.. हा नर वाघ T3C1, ज्याला 'वॉकर II' म्हणूनही ओळखले जातो. मार्च २०२१ मध्ये टिपेश्वर येथून साधारण ३३० किमीहून अधिकचा प्रवास करत गौताळा अभयारण्यात पोहोचला होता. १५ मार्च २०२१ रोजी पहिल्यांदा तो वनविभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाला होता. या वाघाला गौताळा अभयारण्यातील सुरक्षित अधिवास, पाणी आणि तृणभक्षक प्राण्यांचे (अन्न) मुबलक प्रमाण मिळाल्याने तो तिथेच पूर्णपणे रमला आहे. वनविभागाकडून त्याच्या हालचालींवर ड्रोन आणि ट्रॅप कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जात आहे. त्‍याचे नाव गौतम ठेवण्यात आले असून, त्‍याला जोडीदाराची आवश्यकता आहे; परंतु गौताळ्यात आणखी एखादा वाघ आल्‍यास संघर्ष उद्‌भवण्याची भीती वनाधिकार्‍यांना वाटते.

... तरच वाघांना नवीन अधिवास शोधणे शक्‍य

टिपेश्वर, पैनगंगा, तेलंगणातील वनक्षेत्रे आणि मराठवाड्यातील जंगलांना जोडणाऱ्या वन्यजीव मार्गिका सुरक्षित राहिल्यास वाघांना नवीन अधिवास शोधणे शक्य होऊ शकते. मात्र, या प्रवासात रेल्वेमार्ग, महामार्ग, शेती आणि मानवी वस्त्यांमुळे निर्माण होणारे धोकेही तितकेच गंभीर आहेत. वाघांचे नैसर्गिक स्थलांतर सुरक्षित करण्यासाठी वनक्षेत्रांचे संरक्षण, मार्गिकांचे संवर्धन, कॅमेरा ट्रॅपद्वारे नियमित निरीक्षण आणि मानव-वाघ संघर्ष टाळण्यासाठी समन्वित उपाययोजना करणे आवश्यक आहे.टिपेश्वरमधून सुरू होणारा हा प्रवास केवळ वाघांच्या भ्रमंतीची कहाणी नाही; तो विदर्भ, मराठवाडा आणि सीमावर्ती वनक्षेत्रांमधील अधिवासांची परस्पर जोडणी, वन्यजीव संवर्धन आणि भविष्यातील व्याघ्रसंवर्धनाच्या नियोजनाची दिशाही दाखवतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news