Chandrapur Tiger Attack : चंद्रपूर जिल्हा हादरला! सलग दुसऱ्या दिवशीही वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

शनिवारी पळसगाव (जाट) येथे शेतकऱ्याचा मृत्यू; रविवारी खातगाव-लाडबोरी शिवारात महिला दगावली
Chandrapur Tiger Attack : चंद्रपूर जिल्हा हादरला! सलग दुसऱ्या दिवशीही वाघाच्या हल्ल्यात महिला ठार
Published on: 
Updated on: 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाच्या हल्ल्यांचे सत्र सुरूच असून, सलग दोन दिवसांत दोन जणांचा बळी गेल्याने संपूर्ण परिसरात तीव्र दहशत पसरली आहे. शनिवारी पळसगाव (जाट) येथील शेतशिवारात तीळ कापणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी दुपारी खातगाव-लाडबोरी शिवारात शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर वाघाने प्राणघातक हल्ला केला. या लागोपाठ घडलेल्या घटनांमुळे शेतकरी व शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

तीळ कापणी करताना वाघाचा अचानक हल्ला

प्रमीला पुंडलिक महाडोरे (वय ५३, रा. भेंडाळा) असे रविवारी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या स्थानिक अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, प्रमीला महाडोरे या पतीसह खातगाव-लाडबोरी शिवारातील शेतात तीळ कापणीसाठी गेल्या होत्या. रविवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास त्या शेतात काम करत असताना आणि पती काही अंतरावर असतानाच, झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक त्यांच्यावर झडप घातली. हा हल्ला इतका भीषण होता की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगी असा परिवार आहे.

विशेष म्हणजे, शनिवार आणि रविवारची दोन्ही घटनास्थळे अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असल्याने, एकाच वाघाने हे दोन्ही बळी घेतल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

शनिवारी पळसगाव (जाट) येथे शेतकऱ्याचा गेला होता बळी

दरम्यान, काल शनिवारी सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील पळसगाव (जाट) शेतशिवारातही अशीच धक्कादायक घटना घडली होती. तीळ कापणीसाठी शेतात गेलेले शेतकरी नानाजी नारायण कामडी (वय ५५, रा. पळसगाव जाट) यांच्यावर पट्टेदार वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गावकरी आधीच दहशतीत होते; त्यातच २४ तासांच्या आत दुसऱ्या घटनेची भर पडल्याने वन विभागाच्या भूमिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ऐन हंगामात शेतात जाणे बनले जीवघेणे

सध्या परिसरात तीळ कापणीसह रब्बी हंगामापूर्व मशागतीची कामे जोरात सुरू आहेत. अशा वेळी झुडपी जंगलालगतच्या शेतांमध्ये पट्टेदार वाघाचा वावर वाढल्याने शेतात पाऊल ठेवणेही शेतकऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक बनले आहे. विशेषतः शेतात एकट्यादुकट्या जाणाऱ्या महिला मजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नरभक्षक वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी

सलग दोन दिवसांत दोन बळी घेणाऱ्या या नरभक्षक वाघाचा वन विभागाने तात्काळ बंदोबस्त करावा, अशी आक्रमक मागणी सिंदेवाही तालुक्यातील ग्रामस्थांनी लावून धरली आहे. तसेच दोन्ही पीडित कुटुंबीयांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी आणि शेतकरी-शेतमजुरांच्या संरक्षणासाठी वन विभागाने नियमित गस्त वाढवून ठोस उपाययोजना कराव्यात, असा सूर उमटत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news