

गडचिरोली : शेतात धान कापण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेला वाघाने ठार केल्याची घटना आज सकाळी एटापल्ली तालुक्यातील जारावंडीनजीकच्या इरपनपायली येथे उघडकीस आली. बिलाशी आनंद बा (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे.
बिलाशी या सोमवारी(ता.१९) जंगलानजीक असलेल्या शेतात धान कापण्यासाठी गेल्या होत्या. परंतु संध्याकाळ होऊनही त्या घरी परतल्या नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. आज सकाळी शेतापासून काही अंतरावर जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस आणि वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह गडचिरोली येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. बिलाशी बा यांना पती, तीन मुले आणि नातवंडं असा परिवार आहे.
यापूर्वी १७ ऑगस्टला जारावंडीनजीकच्या दोलंदा येथील हरी वड्डे नामक शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. त्यानंतर नागरिकांनी जारावंडी आणि पेंढरी येथे चक्काजाम आंदोलन करुन वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. परंतु वनविभागाने ठोस पावले न उचलल्याने शेतकऱ्यांचा बळी जात असून, नागरिक संतप्त झाले आहेत.