

उमरखेड : नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यात दुचाकी तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटार पंप चोरून धुमाकूळ घालणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश करण्यात यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या धडाकेबाज कारवाईत 5 आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून 13 दुचाकी आणि 9 पाण्याचे मोटार पंप असा एकूण 5 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दोन्ही जिल्ह्यातील 12 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
पोलिसांनी साजिद खान वाजिद खान, शेख उमेर शेख मुजीब, मोहम्मद रेहान मोहम्मद रफिक (सर्व रा. उमरखेड), श्रीकांत ऊर्फ शेरा बालाजी सूर्यवंशी (रा. माळसावरगाव, ता. हदगाव, जि. नांदेड) आणि एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले आहे. आरोपींकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी उमरखेड, महागाव, दराटी, वणी आणि हदगाव (जि. नांदेड) पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गुन्हे केल्याची कबुली दिली.
विशेष म्हणजे, चोरीचा माल त्यांनी हदगाव येथील भंगार व्यावसायिक शेख कादीर शेख ख्वाजा (रा. रजानगर, हदगाव) याला विकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून हिरो होंडा स्प्लेंडर, पॅशन प्रो अशा 13 दुचाकी, विविध क्षमतेचे 9 मोटार पंप, सौरऊर्जा पंप, केबल आणि स्प्रिंकलर साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
ही टोळी प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या शेतातील महागडे विद्युत पंप, केबल आणि सौरऊर्जा साहित्य चोरत होती. या टोळीला जेरबंद केल्यामुळे उमरखेड आणि हदगाव परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.