

छत्रपती संभाजीनगर : दारूच्या व्यसनापायी जालना येथून शहरात रस्त्यावर रात्री मुक्काम ठोकून सकाळी माघारी जाताना एक दुचाकी लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यासह साथीदाराला महिनाभरात गुन्हे शाखेने दुसऱ्यांदा बेड्या ठोकल्या. दोघांकडून १४ दुचाकी जप्त केल्या. कृष्णा नारायण मुरडकर (२७, रा. वालसावंगी, ता. भोकरदन) आणि अरुण धनराज कांडेलकर (१९, रा. गोंडखेड, ता. जामनेर, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे असल्याची माहिती गुन्हे शाखेचे डीसीपी रत्नाकर नवले यांनी बुधवारी (दि. २४) दिली.
अधिक माहितीनुसार, कृष्णा मुरडकर हा अट्टल बेवडा आणि सराईत गुन्हेगार आहे. तो दारूपायी शहरातील सिडको आणि हर्सल भागात फिरून दुचाकी चोरीचा सपाटा लावला आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच २१ नोव्हेंबरला त्याला गुन्हे शाखेच्या एपीआय रविकांत गच्चे यांनी बेड्या ठोकून ४ दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यानंतर जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा दुचाकी चोरीचा सपाटा लावला. माहिती मिळताच पुन्हा गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार गच्चे यांच्या पथकाने कृष्णाला अटक केली. त्याने जळगावच्या अरुणमार्फत दुचाकी त्याच भागातील मजुरांना अवघ्या २ ते ३ हजारांत विक्री केल्याचे उघड झाले. पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकून १४ चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार, उपायुक्त रत्नाकर नवले, एसीपी अशोक राजपूत, निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या मार्गदर्शनात एपीआय रविकांत गच्चे, स. फौ. दिलीप मोदी, हवालदार प्रकाश गायकवाड, शेख नवाब, अश्रफ सय्यद, अमोल शिंदे, सोमनाथ डूकळे यांनी केली.
सराईत कृष्णावर ११ गुन्हे दाखल
कृष्णा मुरडकर हा सराईत गुन्-हेगार असून, त्याच्यावर चोरी, जुगार, लूटमार असे बुलढाणा, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथे ११ गुन्हे दाखल आहेत. त्याला २०२१ मध्येही सिडको पोलिसांनी दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातच अटक केली होती. त्यावेळी ३ दुचाकी जप्त केल्या होत्या. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०२५ रोजीही त्याला गुन्हे शाखेनेच अटक करून चार दुचाकी जप्त केल्या होत्या.