

Yavatmal Accident News
यवतमाळ : नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या चिमुकलीच्या अंगावरून ट्रॅक्टर ट्रॉली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि.२२) पुसद तालुक्यातील वनवारला येथे घडली. हा ट्रॅक्टर वाळू उपसा करण्यासाठी आला होता, अशी माहिती आहे. शिवानी सुरेश पवार (वय ९, रा. वनवारला) असे मृत चिमुकलीचे नाव आहे.
शिवानी ही नेहमीप्रमाणे गुरुवारी गावालगतच्या पूस नदीवर कपडे धुण्यासाठी गेली होती. नदीकाठावर ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मागे कपडे धुवत असताना ट्रॅक्टरचालकाला याची माहिती नव्हती. त्याने ट्रॅक्टर मागे घेतला असता शिवानीला धडक बसली. ट्रॉलीचे चाक अंगावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर भयभीत झालेल्या ट्रॅक्टरचालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनास्थळावरून तो विनापरवाना नदीपात्रातून वाळू उपसा करण्यासाठी आला होता, अशी माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवानीच्या नातेवाईकांसह गावकऱ्यांनी पूस नदीवर गर्दी केली. त्यानंतर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. या प्रकरणाचा पुढील तपास पुसद ग्रामीण पोलिस करीत आहेत.