

यावल (जळगाव) : यावल-विरावली रस्त्यावर २० मे २०२५ रोजी सकाळच्या सुमारास एका भीषण अपघातात काकू-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला. कोरपावली येथील रहिवासी निशा जितेंद्र येवले आणि विशाल कुशल येवले हे अपघातात मृत्युमुखी पडले असून, या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निशा आणि विशाल हे कोरपावली येथून यावलकडे काही कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. यावलजवळील कृषी फलोत्पादन केंद्राजवळील खड्डेमय वळणावर समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या स्कूल बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले आणि पुढील तपास सुरू केला आहे. या दुर्घटनेमुळे येवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, कोरपावली गावात शोककळा पसरली आहे. रस्त्यावरील खड्डे आणि तीव्र वळण यामुळेच अपघात घडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या प्रकरणी कुशल येवले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात स्कूल बस चालकाविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.