

Raigad Taloja Car Accident Aniket Nalawade Cardiac Arrest
पनवेल : "देव दारी, त्याला कोण मारी?'', या म्हणीची प्रचिती कळंबोली मधील एका थरारक घटनेत आली. गाडी चालवत असताना आलेल्या हार्ट अटॅकमुळे अपघात झाला. आणि त्यात एका तरुण पादचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ओम गंगाराम तांबे (वय २१, रा. कामोठे) असे मृताचे नाव आहे. मात्र, या अपघातात खुद्द चालक असलेले अनिकेत नलावडे यांचे हृदय आणि रक्तदाब तब्बल १५ मिनिटे पूर्णपणे बंद पडला होता. परंतु, आश्चर्यकारकरित्या त्यांनी जीवनदान मिळाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, अनिकेत नलावडे (वय ३२, रा. तळोजा) यांना सोमवारी सकाळी अचानक छातीत वेदना जाणवू लागल्या. पत्नीला सोबत घेत त्यांनी गाडी चालवतच जवळच्या रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, कळंबोली परिसरात पोहोचताच त्यांना तीव्र हार्ट अटॅक आला आणि गाडीवरील नियंत्रण सुटले. भरधाव गाडीने रस्त्यावरून चालत जात असलेल्या २१ वर्षीय तरुणाला धडक दिली. यामध्ये त्या युवकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भयानक होता की युवकाला उडवल्यानंतर, नलावडे याची कार रस्त्यावर पार्क केलेल्या कारवर जाऊन आदळली आणि नलावडे यांची कार थांबली.
अपघातानंतर नलावडे गाडीच्या आतच अडकले होते. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना गाडीतून बाहेर काढले आणि तातडीने कळंबोलीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेव्हा डॉक्टरांनी तपासणी करताच एक धक्कादायक गोष्ट लक्षात आली. अनिकेत यांचे हृदय आणि बीपी पूर्णपणे बंद पडले होते. जवळपास मृत्यूच्या उंबरठ्यावरच ते पोहोचले होते.
पण इथेच घडली एक अविश्वसनीय घटना. नामवंत हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय डिसूजा यांनी तातडीने उपचार सुरू केले. पुढील एक तास अखंड प्रयत्न करत, सीपीआर (CPR), शॉक थेरपी आणि इतर आधुनिक उपचार वापरत त्यांनी अनिकेत यांना पुन्हा शुद्धीवर आणले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, हृदय थांबून १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ गेल्यावर पुनर्जीवन शक्य असते, पण १५ मिनिटांनंतर अशा रुग्णाचे वाचणे ही एक प्रकारची वैद्यकीय आश्चर्याचीच गोष्ट मानली जाते. सध्या अनिकेतची प्रकृती स्थिर असून ते आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली आहेत. त्यांच्या जीविताचा धोका टळल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
दुसरीकडे, या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी कळंबोली पोलिस ठाण्यात वाहन चालक अनिकेत नलावडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अनिकेत यांचे हृदय १५ मिनिटे थांबूनही पुन्हा सुरू झाले. ही घटना एक वैद्यकीय चमत्कार म्हणून ओळखली जात आहे. पण त्याचवेळी एका निष्पाप जीवाला आपले प्राण गमवावे लागले. या घटनेतील काळीज पिळवटून टाकणारी बाजू आहे. या थरारक आणि द्विधा भावनांनी भरलेल्या घटनेने कळंबोली आणि कामोठे परिसर हादरून गेला.
छातीत दुखायला लागल्यास स्वतः गाडी चालवत रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न न करता तत्काळ रूग्णवाहिकेची मदत घ्यावी. कारण हार्ट अटॅकचा झटका केव्हा आणि किती तीव्रतेने येईल, हे सांगता येत नाही. आतापर्यंत मी पन्नास हजारांहून अधिक हार्ट सर्जरी केल्या आहेत. पण अशा प्रकारचे पुनरागमन मी फारच कमी वेळा पाहिले आहे.
- डॉ. विजय डिसूजा, हृदयरोगतज्ज्ञ