

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने सुभाष खेमसिंग पवार या उमेदवाराला बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे. यामुळे वंचितला मोठा धक्का बसला आहे.
शुक्रवारी (दि.६) अर्ज छाननी झाली. यावेळी राठोड यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळल्या होत्या. यामुळे राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन अर्ज भरण्याची ४ एप्रिल ही अखेरची तारीख होती. त्याच्या काही दिवस आधीच वंचितने अचानकपणे उमेदवारी बदलून राठोड यांना दिली होती. यामुळे राठोड यांना तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसल्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
या मतदारसंघातून काल सायंकाळपर्यंत ३८ उमेदवारांनी ४९ अर्ज दाखल केले होते. आज या अर्जांची छाननी सुरु झाली आहे. महायुतीतून राजश्री पाटील तर महाविकास आघाडीकडून संजय देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वंचितने उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची आणि तिरंगी लढत पहायला मिळेल अशी चर्चा होती. परंतु आता वंचितला मोठा धक्का बसला आहे. उमेदवारच बाद झाल्याने वंचितचे या मतदारसंघातील आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे वंचित आता कोणाला पाठिंबा देते, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :