यवतमाळ : नायब तहसीलदारावर हल्ला करणारा जेरबंद; देशीकट्टा जप्त | पुढारी

यवतमाळ : नायब तहसीलदारावर हल्ला करणारा जेरबंद; देशीकट्टा जप्त

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा :  महागाव नायब तहसीलदारावर हल्ला करुन कुख्यात आरोपी ऑक्टोबर महिन्यापासून पसार होता. या आरोपीविरोधात तब्बल आठ गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यांत नोंद आहेत. महागाव एलसीबीच्या पथकाने तीन महिन्यांनी शुक्रवारी (दि.२३) त्याला ताब्यात घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून देशी पिस्टल व एक राउंड जप्त केला. सुरज्या ऊर्फ सूरज कृष्णराव नरवडे (वय २३) रा. संभाजी चौक महागाव असे या आरोपीचे नाव आहे.

सुरज्या हा पूर्वी चोरी, अवैध दारू विक्री, घरफोडी या सारखे गुन्हे करीत होता. नंतर त्याने रेती तस्करीत आपला जम बसविला. २३ ऑक्टोबर रोजी चोरीची रेती घेऊन जाताना कारवाईसाठी नायब तहसीलदार पुढे आल्याने त्यांच्यावर हल्ला चढविला व घटनेनंतर तेथून तो पसार झाला. तेव्हापासून तो स्थानिक पोलिसांना हुलकावणी देत होता. दुसरीकडे आपले कारनामे सुरूच ठेऊन दहशत निर्माण करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक संतोष मनवर व त्यांचे पथक महागावमध्ये दाखल झाले. पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड यांच्या आदेशावरून विशेष मोहीम हाती घेण्यात आली. या कुख्यात आरोपीला जेरबंद करीत त्याच्याजवळून देशी पिस्तुल व एक मॅग्झिन असा ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अग्निशस्त्र बाळगल्याचा गुन्हा त्याच्या विरोधात महागाव पोलिसात नोंदविण्यात आला.

हेही वाचा : 

Back to top button