यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : शेतातील धुऱ्यावर लावलेली आग अनियंत्रित झाली. कापणी करून शेतात ठेवलेले गव्हाचे पीक धोक्यात येताच, एका शेतकऱ्याने जिवाची बाजी लावत आग विझविण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान, त्याला भोवळ आली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना वणी तालुक्यातील उमरी येथे घडली. महादेव गोविंदा माथनकर (वय ८०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
उमरी येथील रहिवासी असलेल्या महादेव माथनकर यांनी यावर्षी शेतात गव्हाचे पीक लावले होते. त्याची कापणी करून त्याचे ढीग शेतातच लावले होते. नेहमीप्रमाणे ते शुक्रवारी शेतात गेले, नव्या हंगामाची तयारी म्हणून धुरे स्वच्छ करण्यासाठी त्यांनी धुऱ्यावरील कचऱ्याला आग लावली. काही वेळातच या आगीने रौद्र रूप धारण केले. आगीचे लोट कापून ठेवलेल्या गव्हाच्या ढिगाऱ्याकडे झेपावू लागताच महादेव माथनकर यांनी ही आग विझविण्यासाठी धावपळ सुरू केली. त्यांनी शेतातील पाण्याची मोटार चालू केली. तसेच प्लास्टिक कॅनमध्ये पाणी भरून त्याद्वारे आग आटोक्यात आणली.
या साऱ्या धावपळीत मात्र अचानक महादेव माथनकर यांना भोवळ आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. सायंकाळी बैल घरी परतले. मात्र, महादेव माथनकर हे घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शेताकडे धाव घेतली, त्यावेळी शेतात आग लागल्याचे दिसून आले. तसेच शेतातच त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.