

Teachers Salary Bill Delay
वाशिम : राज्यातील शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या एकत्रित वेतन देयकांवर स्वाक्षरी न करण्याचे आंदोलन सुरू केल्यामुळे हजारो शिक्षकांचे वेतन रखडले आहे. रखडलेले वेतन तात्काळ अदा करण्यात यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
शालान्त परीक्षेतील गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागातील काही अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होत असल्याने, त्याविरोधात शिक्षणाधिकाऱ्यांनी वेतन देयकांवर स्वाक्षरी करण्यास नकार देत आंदोलन सुरू केले आहे. या भूमिकेमुळे राज्यभरातील लाखो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन अडले असून शिक्षक वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
अधिकार्यांच्या मागण्यांबाबत शिक्षक व शिक्षकेतर संघटनांना सहानुभूती असून, आजवर संघटनांनी नेहमीच सहकार्याची भूमिका घेतली आहे. मात्र आपल्या मागण्या शासनापुढे मांडण्यासाठी अधिकाऱ्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन देयकांवर स्वाक्षरी न करणे म्हणजे त्यांना वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे.
या पार्श्वभूमीवर नियमित वेतन तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी शुक्रवार, २ जानेवारी रोजी वाशिम जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना एकत्र येत माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले. वेतनप्रश्नी तातडीने तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.
निवेदन सादर करताना विविध शिक्षक व शिक्षकेतर संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विभागीय, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सेवानिवृत्त कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.