

Washim Robbery and kidnapping case
वाशिम : जिल्ह्यातील रिसोड पोलीस स्टेशन हद्दीत दरोडा, अपहरण व धमकीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अपहृत व्यक्तीची सुखरूप सुटका करून मुख्य आरोपींना अटक केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मोप गावाजवळ लोणारकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारमधून नांदेड येथील रहिवासी रुग्णाला उपचारासाठी नेत असताना तीन चारचाकी वाहनांनी कार अडवली. कारमधील व्यक्तींना जबर मारहाण करून त्यांच्याकडील २२ हजार रुपये जबरदस्तीने लुटण्यात आले. या घटनेची माहिती वाशिम नियंत्रण कक्षात मिळताच स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांना १० डिसेंबर २०२५ रोजी आसेगावपेन (ता. रिसोड) येथे झालेल्या विवाहाशी संबंधित धक्कादायक माहिती मिळाली. दीपक सिताराम खानझोडे याचा विवाह राधा तुपे हिच्याशी झाला होता. या विवाहासाठी मध्यस्थाला दोन लाख रुपये देण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर नवरी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे समजल्याने कुटुंबीय सतर्क झाले होते.
१३ डिसेंबररोजी तीन अज्ञात वाहनांतून १० ते १२ जण आसेगावपेन येथे आले. नवरी घरात न आढळल्याने त्यांनी घराची तोडफोड करत दीपकचे वडील सिताराम खानझोडे यांचे अपहरण केले. पुढे मोहजा येथेही तोडफोड करून मुलगी परत न दिल्यास अपहृत व्यक्तीचा जीव घेण्याची धमकी दिली.
गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन पथके अहिल्यानगर, संभाजीनगर व जालना येथे रवाना करण्यात आली. अहिल्यानगर येथून सिताराम खानझोडे यांची सुखरूप सुटका करण्यात आली. तसेच राहुल दिलीप म्हस्के, सतीश विनायक जाधव, आकाश छगन गायकवाड यांना अटक करण्यात आली. नवरी व एजंट शांताराम खराटे यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनमध्ये दोन गुन्हे दाखल असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व रिसोड पोलीस यांनी संयुक्तपणे केली आहे.