

Midnight Raid Washim
वाशिम : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासह अवैध धंदे, अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे आणि फरार आरोपींना आळा घालण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाने मध्यरात्री जिल्हाभरात विशेष धडक मोहीम राबविली. १७ नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात आलेल्या या मोहिमेत पोलिसांनी ७ किलो २५० ग्रॅम गांजासदृश अंमली पदार्थ जप्त केला असून, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या विशेष मोहिमेत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांची पथके आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी समन्वयाने कारवाई केली. या कारवाईदरम्यान गांजासदृश पाने, फुले आणि बिया असलेला ७ किलो २५० ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. तसेच बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय हत्यार कायद्यान्वये दोन स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या.
याशिवाय न्यायालयाने जारी केलेल्या अजामीनपात्र वॉरंटमधील (NBW) आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांच्या रेकॉर्डवरील पाहिजे असलेले आणि फरार गुन्हेगारांचाही शोध घेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकूण १४ संशयित ठिकाणांची तपासणी करून आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
जिल्ह्यातील अवैध धंदे, अंमली पदार्थांची तस्करी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच विविध गुन्ह्यांतील पाहिजे आणि फरार आरोपींविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या विशेष मोहिमा राबविण्यात येणार असल्याचे पोलिस दलाने स्पष्ट केले आहे. गुन्हेगारीला आळा घालणे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही मोहीम जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील आणि अपर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत २५ पोलिस अधिकारी आणि ११० पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.