

वाशिम : जवळा कुंभार शिवारातील आसेगाव-अनसिंग मार्गावरील शेतातील विहिरीत पडून दोन मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सोमवारी (दि. १६ नोव्हेंबर) सकाळी ९.१५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाच्या जवानांनी जीवाची बाजी लावत तब्बल तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दोघांचेही मृतदेह विहिरीतून बाहेर काढले.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जवळा कुंभार शिवारातील एका शेतात विहिरीचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी फर्मे भरण्यासाठी मुरूम टाकण्याचे काम सुरू असताना संतोष रामदास जामनिके (वय ४५, रा. अंबापूर, ता. मंगरूळपीर) यांचा अचानक तोल जाऊन ते विहिरीत पडले. त्यांना वाचविण्यासाठी सोबत काम करणारे वसुदेव श्रीराम धोंगडे (वय ४०, रा. हिसई, ता. मंगरूळपीर) यांनी विहिरीत उडी घेतली. मात्र, दुर्दैवाने दोघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच आसेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेळके यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनचे प्रमुख तथा जीव रक्षक दीपक सदाफळे यांना संपर्क करून बचाव पथकाला तातडीने पाचारण केले. त्यानुसार दीपक सदाफळे हे गोपाल गिरे, लखन खोडे, दत्ता मानेकर, नागेश राऊत, शुभम भोपळे, सागर डाके आणि हर्षल वानखडे या सहकाऱ्यांसह शोध व बचाव साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळाची पाहणी केली असता विहीर सुमारे ५५ फूट खोल असून त्यामध्ये २० फूट पाणी असल्याचे निदर्शनास आले. विहिरीचे बांधकाम अर्धवट असल्याने तसेच नुकतेच फर्म्यांचे बांधकाम झाल्याने परिस्थिती धोकादायक होती. अशा आव्हानात्मक परिस्थितीत दीपक सदाफळे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने शोधमोहीम सुरू केली. पथकाच्या जवानांनी तब्बल तीन तास प्रयत्न करून दोन्ही मजुरांचे मृतदेह बाहेर काढले आणि पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिले.
पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची उपस्थिती
या बचाव मोहिमेदरम्यान आसेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष शेळके, पोलीस जमादार नंदकिशोर भडके, शाम गायकवाड व पोलीस अंमलदार दादाराव भोयर उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनीही सतत संपर्क साधून बचावकार्याची माहिती घेतली. यावेळी मृतांच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अत्यंत धोकादायक परिस्थितीतही मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या जवानांनी दाखविलेली तत्परता, धाडस आणि सेवाभावाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.