

वाशिम : एकीकडे महावितरणचा गलथान आणि मनमानी कारभार, तर दुसरीकडे अवाच्या सव्वा बिलांच्या नावाखाली सर्वसामान्यांची होणारी आर्थिक लूट. या दुहेरी कात्रीत अडकलेल्या ग्राहकांचा संयम आता अखेर सुटला आहे. वाशिममधील गोंदेश्वर परिसरात थकीत वीज बिल वसुली करणाऱ्या महावितरणच्या पथकाला जनतेच्या रोषाचा सामना करावा लागला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन एका संतप्त ग्राहकाने चक्क सहाय्यक अभियंत्याला लाकडी काठीने मारहाण केल्याची खळबळजनक घटना शनिवारी १४ मार्च रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सहाय्यक अभियंता मोबीन बशीर शेख हे आपल्या पथकासह 'मार्च एंडिंग'च्या नावाखाली थकीत वीज बिल वसुलीची मोहीम राबवत होते. गोंदेश्वर येथील एका ग्राहकाचे मीटर काढत असतानाच प्रविण मडके नामक तरुण तिथे आला आणि वादाची ठिणगी पडली. "वापरायला वीज नाही आणि बिलात सवलत नाही, मग सक्तीची वसुली कशासाठी?" असा सवाल केला. शाब्दिक चकमकीनंतर संतापाचा पारा चढलेल्या मडके याने लाकडी काठीने अभियंता शेख यांच्यावर हल्ला चढवला, ज्यामध्ये शेख यांच्या हाताला दुखापत झाली आहे.
प्रशासकीय अनास्था आणि अवाच्या सव्वा बिले
या घटनेने महावितरणच्या कारभाराचे धिंडवडे काढले आहेत. सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या प्रत्यक्ष वापरापेक्षा कितीतरी पटीने जास्त बिले पाठवून महावितरणने सध्या 'लुटीचा' परवानाच काढला की काय, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, त्रुटी असलेल्या बिलांबाबत दाद मागण्यासाठी नागरिक जेव्हा कार्यालयात जातात, तेव्हा त्यांना सन्मानाची वागणूक मिळण्याऐवजी ताठरपणाचा सामना करावा लागतो.
मारहाण करणाऱ्यावर पोलीस कारवाई
या राड्याप्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण मडके याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३२, १२१, ३५१(२), ३५१(३) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक देविदास झूंजे करत आहेत.