

वाशिम : मध्यपूर्व आशिया, अमेरिका आणि युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधनाचा तुटवडा भासणार नसल्याची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी ब्रिजेश पाटील यांनी दिली आहे. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल तसेच गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधनाचा पुरवठा सुरळीत राहील, याबाबत जिल्हा प्रशासन सतर्क असल्याचे त्यांनी सांगितले.
भारत पेट्रोलियम, हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑईल या तिन्ही प्रमुख तेल कंपन्यांकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी तसेच एलपीजी गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यात इंधनाचा साठा कायम राखण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि तेल कंपन्या समन्वयाने काम करीत आहेत. त्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तसेच पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी करू नये, असेही प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची परिस्थिती असली तरी खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला असून सध्याची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.