

Washim Municipal Council
वाशिम : वाशिम नगर परिषदेतील विविध विषय समित्या तसेच स्थायी समितीच्या सभापती व उपसभापतींची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे नगर परिषदेच्या कारभाराला नवी दिशा मिळणार असून शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नगर परिषदेतील आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण यांसारख्या महत्त्वाच्या समित्यांची जबाबदारी अनुभवी व कार्यक्षम नगरसेवकांकडे सोपविण्यात आली आहे.
आरोग्य समितीच्या सभापतीपदी राजू भांदुर्गे यांची निवड करण्यात आली असून शहरातील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम समितीची जबाबदारी राहुल तुपसांडे यांच्याकडे सोपविण्यात आली असून रस्ते, नाली व इतर पायाभूत सुविधांची कामे वेगाने पूर्ण केली जातील, असा विश्वास व्यक्त होत आहे.
शिक्षण समितीच्या सभापतीपदी कुणाल हेडा, तर नियोजन समितीच्या सभापतीपदी अरुणा वाटाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी वर्षा हजारे यांची निवड झाल्याने शहरातील पाणीटंचाई व संबंधित समस्यांवर ठोस उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.
महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी गोकुळाबाई इंगोले, तर उपसभापतीपदी पूजा विशाल काळे यांची निवड करण्यात आली आहे. महिलांच्या समस्या, बालकल्याण योजना व सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, नगर परिषदेच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदी अनिल ताजने यांची निवड करण्यात आली आहे. स्थायी समितीच्या सदस्य म्हणून जयश्री संतोष वानखेडे व साबीर मिर्झा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे वाशीम शहरातील रखडलेली विकासकामे मार्गी लागतील, नागरिकांच्या मूलभूत समस्यांवर प्रभावी उपाययोजना होतील तसेच नगर परिषदेच्या कामकाजात पारदर्शकता वाढेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही नवी टीम कितपत यशस्वी ठरते, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.