

Washim Agriculture Officer Suspended
वाशिम : वाशिम जिल्ह्यातील गोगरी येथील शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या कृषी अधिकारी सचिन कांबळे याचे अखेर निलंबित करण्यात आले आहे. शासन स्तरावरून हे निलंबन आदेश देण्यात आले. या अधिकाऱ्याचे वर्तन शासकीय शिस्तीला धरून नसून ते लोकसेवकाच्या आचारसंहितेचे उल्लंघन करणारे असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीरचे तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना १३ जानेवारी रोजी गोगरी गावात घडली होती.
मागील चार महिन्यांपासून फळबागच्या मस्टरचे पैसे मिळाले नाही म्हणून गोगरी येथील शेतकरी ऋषिकेश पवार यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. तक्रारी नंतर तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे गोगरी गावात गेले असता त्यांना भेटण्यासाठी गेलेल्या शेतकरी ऋषिकेश पवार याला तालुका कृषी अधिकाऱ्याने मारहाण केली होती.
शेतकऱ्याला मारहाण केल्याच्या निषेधार्थ मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली होती. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घेराव घालून या अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली होती.
याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कृषी विभागाने घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांकडे अहवाल पाठवण्यात आला होता. त्यानुसार तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे यांचं निलंबन करण्यात आले असून चौकशीअंती पुढील कारवाई करण्यात येणार आहे.