

Khandala Kadoli Road Poor Quality Work
वाशिम : वाशिम जिल्ह्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून तयार करण्यात आलेल्या खंडाळा–आडोळी–जुमडा–टो–वाघोली–अटकळी–गोरेगाव–हिंगोली–कडोळी या महत्त्वाच्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा गंभीर आरोप करत आडोळी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन इढोळे यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर करून चौकशीची मागणी केली आहे
सदर रस्ता हा विदर्भ व मराठवाडा भागाला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग असून, सुमारे १५ ते २० गावांचा मुख्य संपर्क रस्ता आहे. मात्र, रस्ता पूर्ण झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांतच रस्त्यावरील डांबर उखडणे, सिमेंट रस्त्याला खोल तडे जाणे तसेच रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे खड्डे पडणे, अशी धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे वाहनचालक, शेतकरी, विद्यार्थी व रुग्णवाहिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, हा रस्ता जीवघेणा ठरत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मागील उन्हाळ्यात या रस्त्याची काही प्रमाणात डागडुजी व दुरुस्ती करण्यात आली होती; मात्र एक पावसाळाही पूर्ण होण्यापूर्वीच रस्ता पुन्हा खराब झाल्याने कामाच्या दर्जावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या प्रकरणी यापूर्वी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चौकशीचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई किंवा चौकशीचा निष्कर्ष समोर आलेला नसल्याने संपूर्ण प्रकरण ‘गुलदस्त्यात’ असल्याचा आरोप गजानन इढोळे यांनी केला आहे.
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेनुसार रस्त्याची पाच वर्षांची देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी ठेकेदार व संबंधित अभियंता यांच्यावर असते. तरीही केवळ एका वर्षातच रस्ता उध्वस्त होणे म्हणजे शासन निधीचा उघड अपव्यय व भ्रष्टाचार असल्याचे निवेदनात नमूद आहे.
निवेदनाद्वारे संबंधित रस्त्याच्या कामाची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करावी, दोषी ठेकेदार व अभियंत्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून तात्काळ निलंबन करावे, तसेच संपूर्ण रस्ता नव्याने व दर्जेदार पद्धतीने पुनर्बांधणी करावी, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे. याबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको, धरणे व बेमुदत आंदोलन छेडण्याचा इशाराही गजानन इढोळे यांनी प्रशासनाला दिला आहे.