

Washim Heavy Rain
वाशीम : 16 ऑगस्ट रोजी पासून सुरु असलेल्या ढगफुटीमुळे जिल्ह्यात ढगलफुटीचा कहर झाला असून नदी-नाल्याना महापूर तर जिल्ह्यातील शेतकरी अतोनात संकटात सापडले आहेत. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात उभे असलेले कापूस, सोयाबीन, तुरीसह सर्व पिके अक्षरशः आडवी-उभी पडली. नदीकाठची सुपीक जमीन मोठ्या प्रमाणावर वाहून गेली असून, अनेक शेतकऱ्यांचे हंगामभराचे श्रम पाण्यात गेल्याची स्थिती निर्माण झाली आहे.
पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्याच्या परिसरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान, जमिनीची खरडपट्टी, होऊन शिवारातील मार्ग वाहून गेल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. त्यामुळे प्रशासनाने सरसकट पंचनामे करून तातडीने जिल्ह्यात शासकीय मदत द्यावी, अशी आक्रोशपूर्ण मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व गावाचे तलाठी , तहसीलदार, कृषी अधिकारी,तसेच प्रशासनाचे मुख्य अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी शेतकरी संदीप पुंडलिकराव ठाकरे, दादाराव भेंडेकर, प्रकाश सानप, व आदी शेतकऱ्यांनी आपली मागणी अधिकाऱ्यां समोर मांडली.
शेतकऱ्यांच्या माहितीनुसार अनेक एकरांमधील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. सुपीक मातीचे थर वाहून गेल्याने पुढील हंगामासाठी शेतीयोग्य जमीन तयार करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शिवारातील लहान रस्ते व पाणी अडवण्यासाठी बांधलेले बंधारे वाहून गेल्याने शेतीला दुहेरी फटका बसला आहे.