

Heavy rainfall Washim
वाशीम: गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने दडी मारल्याने काळजीत पडलेल्या वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसाने गुरूवारी (दि.७) रात्रीपासून दमदार पुनरागमन केले. संततधारेमुळे कोमेजून चाललेल्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.
जून महिन्याच्या सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाने तब्बल दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ ओढ दिली. यामुळे सोयाबीन, कापूस, तूर, मूग यासारखी कोवळी पिके माना टाकू लागली होती. जमिनीला भेगा पडण्यास सुरुवात झाली होती आणि पिके पिवळी पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील पाणी आणि आभाळाकडे लागलेल्या नजरा, असे चिंताजनक चित्र निर्माण झाले होते. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले होते.
मात्र, काल रात्रीपासून निसर्गाने शेतकऱ्यांच्या हाकेला ओ दिली. रात्री उशिरा सुरू झालेल्या पावसाने सकाळपर्यंत संपूर्ण जिल्हा व्यापला. काही ठिकाणी रिमझिम तर अनेक भागांत मुसळधार सरी बरसत असून, या पावसामुळे शिवारांमध्ये पुन्हा चैतन्य पसरले आहे. या पावसाने पिकांना जीवदान मिळाले आहे.
पावसाअभावी वाया जाणाऱ्या पिकांमुळे शेतकऱ्यांवर येणारे दुबार पेरणीचे आर्थिक संकट आता टळले आहे. तर सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील ओढे, नाले आणि लहान नद्या पुन्हा खळाळून वाहू लागल्या आहेत. ज्यामुळे भूजल पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. पावसामुळे शेतातील आंतरमशागतीची कामे, खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाच्या कामांना आता वेग येणार आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकरी वर्गातील उत्साह द्विगुणीत झाला आहे. या एका पावसाने जिल्ह्यातील खरीप हंगामाचे चित्र पूर्णपणे पालटले असून, बळीराजा पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागला आहे.