

वाशीम: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वाशीम जिल्ह्यात हाहाकार माजवला असून, रिसोड तालुक्यातील एका वृद्ध शेतकऱ्याला पुराच्या पाण्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. शेतात कामासाठी गेलेले पिराजी किसन गवळी (वय ६९) हे पुराच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेले होते. अखेर दोन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आल्याने वाडी रायताळ गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना १५ ऑगस्ट रोजी सकाळी घडली. पिराजी किसन गवळी (वय ६९, रा. मौजे वाडी रायताळ, ता. रिसोड, जि. वाशीम) हे नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी गेले असता, स्थानिक खालतनच्या नदीला अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात ते सापडले आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने शोधकार्य सुरू केले होते. मात्र, पावसाचा जोर आणि पाण्याचा वेग यामुळे शोधकार्यात मोठे अडथळे येत होते.
सतत दोन दिवस अथक प्रयत्न केल्यानंतर, आज (दि. १६ ऑगस्ट) सकाळी वाडी रायताळ शिवारातील त्याच नदीच्या पात्रात पिराजी गवळी यांचा मृतदेह आढळून आला. शोधमोहीम थांबली, पण गवळी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून अनेक नद्या आणि नाले धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कुठलाही धोका न पत्करता नदी-नाल्यांच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत पुन्हा एकदा करण्यात आले आहे.