MPSC Success Washim | अडचणींना बनविले प्रेरणेचे साधन : गणेश वाघची एमपीएससी परिक्षेत झेप

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक पदासाठी निवड
Ganesh Wagh MPSC Exam Success
Ganesh Wagh MPSC Exam SuccessPudhari
Published on
Updated on

Ganesh Wagh MPSC Exam Success

वाशिम : ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंब, मर्यादित आर्थिक परिस्थिती, महागड्या क्लासेसचा अभाव आणि मोठ्या शहरातील अभ्यासाचे वातावरण नसतानाही जिद्द, चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर यश संपादन करता येते, हे आडगाव हजारें (ता. वाशिम) येथील गणेश भाऊराव वाघ यांनी सिद्ध केले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत त्यांनी राज्यातून २९वा क्रमांक पटकावत कुटुंबासह ग्रामीण भागाचे नाव उज्ज्वल केले आहे.

विशेष म्हणजे कोणत्याही महागड्या क्लासेस किंवा खासगी शिकवणीचा आधार न घेता वाशिममध्ये राहून स्वअभ्यासाच्या जोरावर त्यांनी हे यश मिळविले. गणेश यांचे आठवीपर्यंतचे शिक्षण आडगाव येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर कोकलगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालयातून त्यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पुढे सरस्वती महाविद्यालयातून समाजकार्य विषयात पदवी घेतली. पदवीचे शिक्षण घेत असतानाच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारीला सुरुवात केली.

Ganesh Wagh MPSC Exam Success
Washim News | जीर्ण इमारतीत भरते शाळा; राजकीय श्रेयवादात अडकली नवीन इमारत

अडचणींना बनविले प्रेरणेचे साधन

ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करताना अभ्यासासाठी आवश्यक सुविधा मर्यादित होत्या. मात्र, गणेश यांनी परिस्थितीला दोष न देता अडचणींचेच प्रेरणेत रूपांतर केले. नियोजनबद्ध अभ्यास, सातत्य आणि प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपले ध्येय कायम डोळ्यांसमोर ठेवले.

दरम्यान, ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांची आयटीआयमध्ये लिपिक म्हणून नियुक्ती झाली. नोकरी मिळाल्यानंतरही त्यांनी आपल्या ध्येयाशी तडजोड केली नाही. नोकरी सांभाळत त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरूच ठेवला. अखेर मे २०२६ मध्ये त्यांनी MPSCची मुख्य परीक्षा दिली.

Ganesh Wagh MPSC Exam Success
Washim news: कुटुंबीयांचा आंतरजातीय विवाहाला विरोध; प्रेमीयुगलाचा तलावात उडी घेऊन शेवट

दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक पदासाठी निवड

१४ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या निकालात गणेश वाघ यांनी राज्यातून २९वा क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशामुळे दुय्यम निबंधक, मुद्रांक निरीक्षक श्रेणी-१ तसेच राज्यकर निरीक्षक या पदांसाठी त्यांची निवड झाली आहे.

गणेश वाघ यांचा हा प्रवास केवळ एका विद्यार्थ्याच्या यशाची कहाणी नसून, ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. सुविधांची कमतरता असली तरी जिद्द, मेहनत आणि सातत्याच्या जोरावर मोठे यश मिळविता येते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यांच्या यशाबद्दल आई-वडील, शिक्षक, मार्गदर्शक आणि मित्रपरिवारासह विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news