

वाशीम : शहरात आज श्री गणेश विसर्जन सोहळ्याची सुरुवात धार्मिक वातावरणात, ढोल-ताशांच्या गजरात व भक्तिमय जल्लोषात झाली. या सोहळ्याचे उद्घाटन खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते मानाचा गणपती शिवशंकर गणेश मंडळ यांची पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. सकाळी सर्व गणेश मंडळांच्या प्रतिनिधी व भाविकांच्या उपस्थितीत खासदारांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याला माल्यार्पण करून व गणरायांची पूजाअर्चा करून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.
यावेळी खा. संजय देशमुख, आ. किरणराव सरनाईक,जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल, पोलीस निरीक्षक देवेंद्रसिह ठाकूर, मा. आ. विजयराव जाधव,मा. नगराध्यक्ष अशोक हेडा, गोविंद रंगभाळ, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे,मा. नगराध्यक्ष लक्ष्मनराव इंगोले, उबाटा जिल्हा प्रमुख सुरेश मापारी, डॉ. सिद्धार्थ देवळे,डॉ. सुधीर कव्हर, प्रा. दिलीप जोशी, प्रा. संगीताताई इंगोले, डॉ. कविता खराट, राजू पाटिल राजे, मो. मुस्तफा मो. मतीन अखिलभाई तेली,राजू रंगभाळ, कॉ. प्रशांत सुर्वे, गजानन वडजिकर, गजानन भांदुर्गे, जुगलकिशोर कोठारी, पदाधीकारी, गणेश भक्त उपस्थित होते.
शहरातील प्रमुख मार्गांवर सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. मिरवणुकीत पारंपरिक ढोल-ताशा पथकांचा गजर, लेझीम, नृत्य पथकांच्या तालावर युवक-युवतींनी सहभाग नोंदवला. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
यावेळी खासदार संजय देशमुख म्हणाले, “गणराय ही श्रद्धा, संस्कृती आणि ऐक्याचे प्रतीक आहे. विसर्जन सोहळा हा सामाजिक बंध मजबूत करणारा उत्सव आहे. नागरिकांनी शिस्त, संयम आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन पार पाडावे”.
मिरवणुकीच्या मार्गावर सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस प्रशासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नगरपालिका व विविध सामाजिक संघटनांकडून पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्य सुविधा आणि स्वच्छतेची तयारी करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख गणेश मंडळांच्या मूर्ती पारंपरिक रथ, सजवलेल्या ट्रक व आकर्षक सजावटीसह मिरवणुकीत सहभागी झाल्या. महिलांनी आरत्या करून, तर बालगोपाळांनी फुग्यांसह वेशभूषेत सहभाग घेऊन सोहळ्याची शोभा वाढवली.
दरम्यान, नदीकाठावर विसर्जनासाठी प्रशासनाने कृत्रिम तलाव, प्रकाशयोजना व सुरक्षा व्यवस्थेची चोख सोय केली असून नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.