

Extortion Case Washim
वाशिम : सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर व व्हिडिओ प्रसारित करून २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या आरोपावरून वाशीम शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हरीश गोवर्धनदास सारडा, पंकज अनिल इंगोले , आनंद आसार खिरडे , तेजराव किसनराव इनामदार आणि नारायण वानखेडे यांना आरोपी करण्यात आले आहे.
या संदर्भात राजू उद्धवराव पाटील (रा. माधव नगर, वाशीम) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २६ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १०.१९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे, काही आरोपींनी एकत्र येऊन सोशल मीडियावर फिर्यादीची बदनामी होईल असा मजकूर व व्हिडिओ प्रसारित केले. तसेच विविध फेसबुक पेज व व्हॉट्सअॅप माध्यमांवरून फिर्यादीविरोधात अपप्रचार करण्यात आल्याचा आरोप आहे. या माध्यमातून फिर्यादीवर दबाव टाकून २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनुसार, आरोपींनी फिर्यादीचा व्हिडिओ व फोटो वापरून बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्या. तसेच शहरात फिर्यादीच्या विरोधात पत्रके व संदेश पसरवून समाजात त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आरोपींनी प्रकरण मिटवण्यासाठी पैशांची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकारामुळे फिर्यादीला मानसिक त्रास सहन करावा लागला असून अखेर त्यांनी वाशीम शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाचा तपास एपीआय अरुण बद्रीप्रसाद नागरे करत आहेत.
आरोपींचे हेदराबाद कोनेक्शन उघड :
आरोपी हरीश सारडा व त्यांच्या साथीदारांनी हैदराबाद येथे राहणार मल्लेश नावाच्या व्यक्तीला खंडणीतून मिळणाऱ्या रकमेतून तुला दोन ते तीन कोटी रुपये देतो असे प्रलोभन देऊन त्याला दारू पाजून त्याचा व्हीव्हीडिओ तयार करून राजू पाटील यांच्याविषयी बदनामीकारक वाच्यता करून घेऊन त्याचा विडिओ सोशल मीडियावर वाशीम जिल्ह्यात व्हायरल केला होता.
त्याकरिता सर्व आरोपी हैदराबाद येथे गेले होते. परंतु नियतीने त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवला असून पोलीस तपासात सदर मल्लेश धर्माजी नावाच्या व्यक्तीने वाशीम पोलीस स्टेशन ला हजार राहून आपले बयान नोंदविले असून त्यामध्ये त्याने खंडणीतील पैसे देण्याचे आश्वासन हरीश सारडा यांनी दिले होते असे कबूल केले आहे . त्यामुळे सर्वच आरोपी अडचणीत आले असून पोलीस प्रशासन खंडणीखोरांचा बंदोबस्त कसा करते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओ व इतर पुराव्यांची तपासणी करण्यात येत असून आरोपींच्या भूमिकेचा पुढील तपास सुरू आहे.