
Stone Pelting Incident in Washim
वाशिम: वाशिम शहराच्या शुक्रवार पेठ भागात दोन गटांत तुफान राडा झाला. ही घटना गुरूवारी (दि. १९) रात्री १० च्या सुमारास घडली. तलवारी आणि लोखंडी रॉड हातात घेऊन दोन गट समोरासमोर आल्याने परिसरात दहशत निर्माण झाली होती. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता असून सीसी टीव्हीच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहे.
शुक्रवार पेठ भागात असलेल्या व्यवहारे गल्लीत रात्री १० च्या दरम्यान दोन गटांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. दोन गट समोरासमोर आले अन् हातात तलवारी, लोखंडी रॉड घेऊन दोन्ही गटांनी एकमेकांवर हल्ला चढविला. या दगड फेकीमध्ये काही वाहनांचे नुकसान झाले. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मात्र, पोलिसांनी ऐनवेळी हस्तक्षेप केल्यामुळे हा वाद निवळला. या घटनेचे नेमके कारण अद्यापही अस्पष्ट असून मोबाईलवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या या भागात तणावपूर्ण शांतता असून संपूर्ण परिस्थिती पूर्व पदावर आहे. पोलिसांनी जवळपास २० आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.