

Washim Girl Found Dead Crime Incident
वाशिम : वाशिम जिल्ह्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका मतिमंद मुलीचा नग्नावस्थेतील मृतदेह काजळेश्वर (ता. कारंजा) येथील एका पुलाखाली आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारंजा पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काजळेश्वर येथे राहणाऱ्या 20 ते 22 वर्षीय मतिमंद मुलीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला आहे. तिच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाल्याने दगडाने ठेचून हत्या केली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला आहे.
मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत आढळून आल्याने तिच्यावर बलात्कार करून हत्या केल्याचा कुटुंबियांनी संशय व्यक्त केला आहे. तर आरोपींना अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी घेतली. दरम्यान, दोन संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. उत्तरीय तपासणीनंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे जिल्हा पोलीस अधीक्षक अनुज तारे यांनी सांगितले.