

Shop Burglary Washim
वाशिम : गेल्या तीन वर्षांपासून वाशिम शहरात दुकान फोड्या करून पोलिसांना चकवा देणाऱ्या 'कंबलवाला' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अट्टल घरफोड्याला वाशिम शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या (डीबी पथक) पथकाने अखेर अटक केली. खेत्राजी माणिक पवार (वय ५२, रा. खरबी, जि. हिंगोली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून रोख रकमेसह एकूण १ लाख १८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीने शहरातील सात दुकाणफोड्यांची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी दिवसा खोट्या नावाने वैद्यकीय उपचारासाठी आल्याचा बहाणा करून हिंगोलीहून वाशिममध्ये येत असे. दिवसभर विविध भागात फिरून बंद दुकाने हेरल्यानंतर रात्रीच्या वेळी अंगावर घोंगडी ओढून आणि चेहरा पूर्णपणे झाकून दुकाणफोड्या करत असे. त्यामुळे सीसीटीव्हीमध्ये त्याची ओळख पटविणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरत होते.
तपासादरम्यान आरोपीने पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लाखाळा परिसरातील राठी बाजार, रेणुकाई पेंट्स, इंगोले ॲग्रो सर्व्हिस सेंटर, बदलाणी डेव्हलपर्स, तिरुपती मार्बल्स, स्वराज ट्रॅक्टर शोरूम आणि ओम ट्रेडर्स येथे चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३३४(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मोबाईलचा वापर करत नसल्याने त्याचा माग काढणे अवघड झाले होते. सीसीटीव्ही फुटेजमध्ये केवळ डोळे, हातातील घड्याळ आणि चालण्याची विशिष्ट शैली याच आधारावर पोलीस तपास करत होते.
काही दिवसांपूर्वी सकाळी पाटणी चौक परिसरात पोलीस शिपाई अजित खंडाळकर आपल्या मुलांसह आले असताना त्यांची नजर एका संशयित व्यक्तीवर पडली. डोळे आणि हातातील घड्याळावरून त्यांनी त्याला ओळखले. चौकशीचा प्रयत्न करताच संशयिताने धक्का देत पळ काढला. खंडाळकर यांनी तत्काळ मुलांना सुरक्षित ठिकाणी बसवून नागरिकांच्या मदतीने महात्मा फुले भाजी मार्केट परिसरात त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. चौकशीत आरोपीने दुकाणफोड्यांची कबुली दिली.
आरोपीच्या अंगझडतीत आणि बॅगेतून कुलूप तोडण्यासाठी वापरण्यात येणारी लोखंडी टॉमी, मोठा पेचकस, छोटी बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि गुन्ह्यावेळी अंगावर घेण्यात येणारी घोंगडी जप्त करण्यात आली. तसेच ४० हजार ७९० रुपये रोख, चोरीच्या पैशातून खरेदी केलेली तीन महागडी घड्याळे, एक मोबाईल, एक रेंजर सायकल आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख १८ हजार ७९० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे (पाटील), अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी नवदीप अग्रवाल आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वाशिम शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संजय चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र आडोळे तसेच पोलीस अंमलदार राजेश राठोड, अष्टसिद्ध नप्ते, नंदकिशोर कुऱ्हाडे, विशाल इंगळे, किशोर खंडारे आणि विशेषतः पोलीस शिपाई अजित खंडाळकर यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. आरोपीला शिताफीने पकडल्याबद्दल अजित खंडाळकर यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.