

Washim city faces 5-day water crisis, water supply halted for repairs
वाशिम : पुढारी वृत्तसेवा
वाशिम शहारात नगर परिषदे कडून 28 एप्रिल ते 2 मे पर्यत शहराचा पाणीपुरवठा ठप्प राहणार असून सदर जल संकट केबल निकामी झाल्याने निर्माण झाले आहे. रेल्वेचा तांत्रिक पेच पडल्याने ऐन उन्हाळ्यात वाशिमवर ''पाणी संकट" ऊभारले आहे.
एकीकडे सूर्याचा पारा चढत असताना वाशिम शहरावर आता भीषण पाणीसंकट ओढवले आहे. जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा करणारी भूमिगत केबल निकामी झाल्याने संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पाच दिवस पाणी राहणार बंद
रेल्वेच्या हद्दीमुळे कामात 'अडथळा' निर्माण झाला असून सदर तांत्रिक बिघाड हा रेल्वे प्रशासनाच्या हदीत झाला आहे. रेल्वेच्या नियमांनुसार, त्यांच्या टीमच्या उपस्थितीशिवाय महावितरण किंवा इतर कोणतीही यंत्रणा तिथे खोदकाम किंवा दुरूस्ती करू शकत नाही. याच तांत्रिक पेचामुळे दुरूस्तीचे काम रखडले असून त्याचा थेट फटका शहरातील हजारो नागरिकांना बसत आहे. प्रशासनाकडून 5 दिवसांचा 'अल्टिमेटम' देण्यात आला आहे.
नगरपरिषद प्रशासनाने स्प्ष्ट केले आहे की, ही दुरूस्ती पूर्ण होण्यासाठी किमान 4 ते 5 दिवस लागतील. म्हणजेच 2 मे पर्यंत नळाला पाणी येण्याची शक्यता धूसर आहे. ऐन उन्हाळ्यात अचानक ओढवलेल्या या संकटामुळे गुहिणींचे बजेट कोलमडले असून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे प्रशासनाचे आवाहन केले आहे.