

छत्रपती संभाजीनगर : पाणीपुरवठा योजनेतून नक्षत्रवाडीपर्यंत पाणी दाखल झाले आहे. त्यामुळे येत्या महिनाभरात जुन्या एमबीआरमधून शहराला वाढीव ५० एमएलडी पाणी देण्याचे नियोजन महाराष्ट्र जीवन प्राधिकरण करीत आहे. परंतु हे पाणी जुन्या जलकुंभांमध्ये घेतल्यास सहाऐवजी चार दिवसांआड पाणीपुरवठा होईल. पाण्याचे गॅप एक ते दोन दिवसांआडवर न्यायचे असल्यास नवी २२ जलकुंभलागतील, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.
शहरवासीयांना दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेतून २५०० मिमी व्यासाची जलचवाहिनी टाकण्यात आली आहे. या कामाचा पहिला टप्पा पूर्णत्वाकडे आला असून, त्यातूनच जायकवाडी धरण ते नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रादरम्यान यशस् वीरीत्या जलवाहिनीची चाचणी घेण्यात आली.
हा पहिला टप्पा कार्यान्वित करून शहराला दोनशे एमएलडी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी २३ मार्च रोजी जॅकवेल, पंपहाऊस यासह मुख्य जलवाहिनीच्या चाचणीचे काम सुरू करण्यात आले होते. थोड्या अडथळ्यांची शर्यत पार करीत पाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी (दि. १४ एप्रिल) यशस्वीरीत्या नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रात दाखल झाले. त्यामुळे मुख्य जलवाहिनीची चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली.
या चाचणीनंतर येत्या महिन्याभरात शहराला पाणी मिळेल, अशी ग्वाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका आयुक्तांनी दिली. आहे. परंतु प्रत्यक्षात काय स्थिती आहे, याबाबत महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, शहराला सध्या तिन्ही जलवाहिन्यांतून १५५ एमएलडी पाणी मिळत आहे.
त्यात आणखी ५० एमएलडी पाण्याची भर पडल्यास शहरातील पाण्याचे गॅप हे सहा दिवसांएवजी चार दिवसांआड होतील. यात केवळ २ दिवसांचाच गॅप कमी होणार आहे. परंतु जर नवे जलकुंभ मिळालेच तर पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. त्यासोबतच पाण्याचे सहा ते सात दिवसांआडहून थेट २ ते ३ दिवसांआडवर येईल, असेही सूत्रांनी सांगितले..
जलवाहिनीनिहाय मिळणारे पाणी
७०० च्या जलवाहिनीतून
३० एमएलडी
१२०० च्या जलवाहिनीतून
१०० एमएलडी
९०० च्या जलवाहिनीतून
२२ एमएलडी
एमजेपी-मनपाचे संयुक्त नियोजन
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) आणि महापालिका पाणीपुरवठा विभाग नव्या जलवाहिनीतून मिळणाऱ्या वाढीव पाण्याचे नियोजन करणार आहे. येत्या आठवडाभरात ही बैठक होणार आहे.