

Washim Shirpur Police Father Arrested
वाशीम: वाशीम जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा या गावी आपल्या विवाहित मुलीचा रुमालाने गळा दाबून खून केल्याचा आणि त्यानंतर तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची अफवा पसरविल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी संशयित आरोपी वडिलांना अटक केली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुलीचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाल्याचे भासविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय आहे. मात्र, या प्रकरणातील नेमके कारण, घटनेची पार्श्वभूमी आणि इतर बाबींचा तपास शिरपूर जैन पोलीस करीत आहेत. या घटनेमागील सत्य उघड करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, तपासातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे,
याबाबत सविस्तर वृत्त असे की, एका वडिलांनी आपल्या मुलीचा गळा दाबून खून केला. व पुरावा नष्ट करण्यासाठी, तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची अफवा पसरवली. त्यानंतर त्यांनी मृत मुलीवर अंत्यसंस्कार करून तिची राख नदीत फेकली. तथापि, शिरपूर पोलिसांना रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनंतर या प्रकरणाचा छडा लागला. पोलिसांनी सध्या मृत मुलीचे वडील, संतोष मारुती गोटे (अंदाजे वय ५२ ) यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीची ओळख मनीषा नाईकवाड (वय ३५) रा.कोरेगाव ता. सेनगाव जि. हिंगोली.ह. मु. ब्राम्हणवाडा, मालेगाव जि. वाशिम अशी आहे.
मनीषाचे लग्न हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात कोरेगाव या गावात झाले होते. वैवाहिक वादानंतर ती तिच्या गावी परत गेली. दसऱ्याच्या सुमारास मुलीच्या प्रियकराला भेटण्यावरून वडील आणि मुलीमध्ये वाद झाला. मालेगाब तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राह्मणवाडा येथे वडिलांनी रुमालाने आपल्या मुलीचा गळा दाबून खून केल्याचे वृत्त आहे. त्याने गावात हृदयविकाराच्या झटक्याने मुलीचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि अंत्यसंस्कार केले.
शिरपूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक योगिता भारद्वाज यांना रात्री उशिरा एक गुप्त माहिती मिळाल्यावर या प्रकरणाला नवीन वळण लागले. पोलिसांनी तपास सुरू केला आणि मृत मुलीच्या वडिलांना ताब्यात घेतले. पोलीस आता संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. काटेपूर्णा नदीत किनाऱ्यावर आलेल्या अस्थींचा शोध घेण्यासाठी शिरपूर पोलिसांनी पाणबुडे तैनात केले आहेत. पोलीस तपास सध्या सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यावर हत्येमागील हेतू आणि घटनेचे इतर पैलू समोर येतील. पुढील तपास शिरपूर पोलीस करीत आहेत.