

Thousands of liters of water wasted in Washim on the verge of water shortage
वाशिम : पुढारी वृत्तसेवा शहरात पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता असताना लाखाळा परिसरातील अंबिका नगर येथील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा व्हॉल्व्ह खराब झाल्याने हजारो लिटर पाणी मुख्य रस्त्यावरून वाहून वाया गेल्याची घटना समोर आली आहे. एकीकडे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे आव्हान असताना दुसरीकडे अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
अंबिका नगर येथील पाण्याच्या टाकीमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडून रस्त्यावरून वाहत असल्याचे छायाचित्रांमधून दिसून येत आहे. व्हॉल्व्ह खराब झाल्यामुळे ही गळती होत असल्याची माहिती नगरसेवक चिकू राठी यांनी दिली आहे. संबंधित व्हॉल्व्ह आणि स्प्रिंगची दुरुस्ती संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल, असेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या प्रमुखांशी चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाईपूर्वीच देखभाल-दुरुस्तीची गरज
अंबिका नगरातील ही घटना केवळ एका ठिकाणापुरती मर्यादित न ठेवता शहरातील संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभालीच्या दृष्टीने पाहण्याची गरज आहे. वाशिम शहरात इतर ठिकाणीही जलवाहिन्या, व्हॉल्व्ह किंवा टाक्यांशी संबंधित यंत्रणेत बिघाड झाल्यास अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होऊ शकते. त्यामुळे अशी घटना घडल्यानंतर दुरुस्ती करण्याऐवजी ती घडूच नये, यासाठी नगरपरिषद प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील सर्व जलवाहिन्या, व्हॉल्व्ह, जोडण्या आणि पाण्याच्या टाक्यांशी संबंधित यंत्रणेची तपासणी करावी. ज्या ठिकाणी गळती, गंज किंवा तांत्रिक बिघाड होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी वेळेत दुरुस्ती करावी. तसेच पाणीगळतीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर तातडीने कार्यवाही होईल, अशी यंत्रणा उभारणे गरजेचे आहे.
मुख्याधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज
पाणी ही मर्यादित आणि मौल्यवान सार्वजनिक संपत्ती आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि गळती रोखणे महत्त्वाचे ठरते. हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून जाणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे.
त्यामुळे वाशिम नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी अंबिका नगरातील घटनेची दखल घेऊन दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्याची खात्री करावी. त्याचबरोबर संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेचे सर्वेक्षण करून आवश्यक देखभाल व दुरुस्तीचे नियोजन करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यापूर्वी पाण्याची नासाडी रोखणे ही काळाची गरज आहे. नगरपरिषद प्रशासनाने वेळीच पावले उचलल्यास अशा प्रकारच्या घटना टाळण्यास मदत होईल आणि नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याचे संरक्षण करता येईल अशा प्रतिक्रिया सुजान नागरिकांमधून उमटत आहेत.