

State Karate Championship Maharashtra
वाशीम : महाराष्ट्र राज्य कराटे स्पर्धेत अनसिंग येथील अलीया मो. बाबर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे. अकोला येथील वसंत देसाई स्टेडियममध्ये महाराष्ट्र अॅमॅच्युअर कराटे असोसिएशनच्या वतीने नुकतीच ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेचे आयोजन सिंहाण अरुण सारवाण यांनी केले होते. १४ वर्षांखालील वयोगटातील व वजनगटातील कुमीते (फाइट) प्रकारात अलीया हिने सहभाग नोंदवला होता. अत्यंत कौशल्यपूर्ण आणि आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन करत तिने प्रतिस्पर्ध्यांवर मात करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
आतापर्यंत अलीया बाबर हिने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये अनेक सुवर्णपदके पटकावत अनसिंग गावासह वाशीम जिल्हा व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याची इच्छा तिने व्यक्त केली आहे.
अलियाला अनसिंग (जि. वाशीम) येथील कराटे प्रशिक्षक बालकिसन नवगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण मिळत असून, सेंसाई सौरभ बालकिसन नवगणकर (ब्लॅक बेल्ट, तिसरी डॅन) यांचे विशेष मार्गदर्शन तिला लाभत आहे.
१९८८ पासून अनसिंग येथे विशेषतः मुलींना मोफत कराटे प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक बालकिसन नवगणकर यांच्या कार्याचे परिसरात विशेष कौतुक होत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी आज परिसरात कराटे प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. भविष्यातही कराटे क्षेत्रात मार्गदर्शन करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अलियाच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिने कराटे क्षेत्रात प्रगती करत आपल्या गावाचे व देशाचे नाव जागतिक पातळीवर उज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.