

Brahma Village Liquor Ban
वाशिम : वाशिम तालुक्यातील मौजे ब्रम्हा येथील ऋषी रेस्टॉरंट अॅण्ड वाईन बार यांची मद्यविक्री अनुज्ञप्ती कायम ठेवावी की रद्द करावी, याबाबत दारूबंदी संदर्भातील विशेष मतदान दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार आहे. जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या आदेशानुसार ही मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार असून, यासाठी तहसिलदार वाशिम निलेश पळसकर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.
तहसिलदार वाशिम यांच्या आदेश क्रमांक जा.क्र. म.स./सा.नि./कावि/२४/२०२६, दि. २३ जानेवारी २०२६ नुसार नायब तहसिलदार सी.एस. आडे यांच्याकडे निवडणूक प्रक्रियेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
३४ – वाशिम (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातील
मतदार यादी भाग क्र. ३३० व मतदान केंद्र क्र. १ :
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ब्रम्हा, खोली क्र. १ (पूर्वेकडील भाग)
मतदार यादी भाग क्र. ३३१ व मतदान केंद्र क्र. २ :
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा, ब्रम्हा, खोली क्र. २ (पूर्वेकडील भाग)
मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील.
मतमोजणी त्याच दिवशी, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ब्रम्हा येथे होणार असून निकाल तात्काळ जाहीर केला जाणार आहे.
शासन राजपत्रातील तरतुदीनुसार, दि. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी अस्तित्वात असलेल्या मतदार यादीतील (भाग क्र. ३३० ते ३३१) नाव नोंद असलेल्या महिला मतदारांनाच या मतदानात सहभागी होता येणार आहे.
एकूण महिला मतदारांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक महिला मतदारांनी मद्यविक्री बंदीच्या बाजूने मतदान केल्यास, ग्रामपंचायत ब्रम्हा हद्दीतील मद्यविक्रीची अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यामार्फत देण्यात येणार आहेत.
या मतदानासाठी वापरण्यात येणारी मतपत्रिका शासन राजपत्रातील परिच्छेद ९ मध्ये नमूद नमुन्यानुसार असणार असल्याची माहिती निवडणूक नायब तहसिलदार तथा प्राधिकृत अधिकारी सी.एस. आडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.