

LPG Cylinder Black Marketing Washim
वाशिम : घरगुती गॅस सिलिंडरचा अवैध व्यावसायिक वापर रोखण्यासाठी प्रशासनाने कारवाईची मोहीम तीव्र केली असून कारंजा शहरात तहसील प्रशासनाच्या पथकाने विविध हॉटेल्स व चहा-नाश्ता केंद्रांवर अचानक छापे टाकले. या मोहिमेदरम्यान एकूण २६ आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तीन ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने संबंधितांकडील सिलिंडर जप्त करण्यात आले.
तपासणीदरम्यान मानोरा रोडवरील हॉटेल अखंड अमृततुल्य, झाशी राणी चौक येथील चहा आणि मी तसेच मंगरूळपीर रोडवरील कुटुंब हॉटेल येथे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या ठिकाणी कारवाई करत सिलिंडर जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
ही कारवाई तहसीलदार रवी महाले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षण अधिकारी स्मिता नायगावकर, मंडळ अधिकारी महेश धानोरकर, ग्राम महसूल अधिकारी अर्चना चिकटे, राहुल वरघट तसेच सागर राऊत आणि तुषार श्रीरामे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, रिसोड तालुक्यातील हॉटेल, धाबे आणि उपहारगृहांचीही तपासणी करण्यात आली. या वेळी निरीक्षण अधिकारी गणेश तांगडे, हावगीराव गंगनर आणि चेतन जाधव यांनी कारवाई केली. सवड येथील न्यू साई हॉटेल येथे घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर होत असल्याचे आढळून आल्याने तेथील सिलिंडर जप्त करण्यात आला. ही कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केवळ घरगुती कारणांसाठीच करण्याचा नियम असून त्याचा व्यावसायिक वापर करणे कायद्याने गुन्हा आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध प्रशासनाकडून यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.