Illegal Water Lifting Washim | धरणांतील मृतसाठ्यावर डल्ला मारणाऱ्यांवर प्रशासनाचा बडगा; मोटारी, पाइप, केबल जप्त

मालेगाव तालुक्यातील मुंगळा धरणावरील मोटारी, पाइप आणि केबल हटविण्यात आल्या
Irrigation Department Action Washim
Irrigation Department Action Washimpudhari
Published on: 
Updated on: 

Irrigation Department Action Washim

वाशिम : जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला असून, सध्या केवळ मृतसाठा शिल्लक आहे. हा पाणीसाठा पशुधनाची तहान भागविण्यासह परिसरातील भूजल पातळी टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा असल्याने त्याचा अवैध उपसा रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत मालेगाव तालुक्यातील मुंगळा धरणावरील मोटारी, पाइप आणि केबल हटविण्यात आल्या. कळंबा महाली येथे रात्रीच्या वेळी गस्त घालण्यात आली, तर चिखली बु. येथे अवैध पाणी उपसा करून खासगी टँकरद्वारे पाणी विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मालेगाव तालुक्यातील मुंगळा लघु पाटबंधारे प्रकल्पावर २७ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाने नियुक्त केलेल्या अवैध पाणी उपसा प्रतिबंधक पथकाने सकाळपासून सायंकाळपर्यंत कारवाई केली. यापूर्वी महावितरण विभागाने अवैध विद्युत जोडण्या खंडित केल्या होत्या. मात्र, संबंधित जोडण्या पुन्हा सुरू करून पाणी उपसा केला जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पथकाने धरणावरील मोटारी, पाइप आणि केबल हटविण्याची मोहीम राबविली. पांगरी, मुंगळा आणि खेर्डी येथील शेतकऱ्यांनीही १०० टक्के मोटारी, केबल व पाइप स्वतःहून काढून घेतले. हे साहित्य वाहून नेण्यासाठी सुमारे २० ते २५ ट्रॅक्टरचा वापर करण्यात आला.

Irrigation Department Action Washim
Washim News | विहिरीत बुडालेल्या दोन मजुरांचे मृतदेह तीन तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर!

दरम्यान, कळंबा महाली लघु पाटबंधारे प्रकल्पातून ट्रॅक्टरद्वारे पाणी उपसा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर २७ नोव्हेंबरच्या रात्री १० ते पहाटे २ वाजेपर्यंत विशेष पथकाने धरणाच्या सर्व बाजूंनी गस्त घातली. या तपासणीत एकही ट्रॅक्टर अथवा विद्युत मोटार आढळून आली नाही. दिवसा सुरू असलेल्या मोटारींवर महावितरण विभागाने लक्ष ठेवावे, तसेच ग्राम समितीनेही अवैध पाणी उपसा होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सोनखास आणि झाकलवाडी शिवारातील धरणालगतच्या विद्युत जोडण्या १५ नोव्हेंबर रोजी खंडित करण्यात आल्या होत्या. मात्र, मागील दोन दिवसांत या जोडण्या पुन्हा सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांकडून अवैध पाणी उपसा होत असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. सोनखास लघु पाटबंधारे प्रकल्पात केवळ मृतसाठा शिल्लक असल्याने संबंधित परिसरातील विद्युत जोडण्या पुन्हा खंडित करण्याची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Irrigation Department Action Washim
Washim News | अमरावती विभागातील दुष्काळग्रस्त १२ लाखांवर शेतकऱ्यांच्या खात्यात ६४१ कोटींची लाखाची दिवाळी मदत जमा!

चिखली बु. ग्रामपंचायत हद्दीत अवैध पाणी उपसा करून खासगी टँकरद्वारे पाणी विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर उपअभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग आणि गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा बोअरवेलपासून ५०० मीटरच्या आत तीन ठिकाणी अवैध पाणी उपसा करून टँकरद्वारे विक्री केली जात असल्याचे आढळले. याप्रकरणी ग्रामपंचायतीने संबंधितांना लेखी नोटीस बजावून हा प्रकार तातडीने बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

धरणांमधील उपलब्ध मृतसाठा जतन करण्यासाठी अवैध पाणी उपशाविरोधातील मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. धरणांवर पुन्हा मोटार, पाइप किंवा केबल आढळल्यास संबंधितांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. पाण्याचा मर्यादित साठा जपण्यासाठी नागरिक आणि शेतकऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.