

MSEDCL Public Appeal
वाशीम : पावसाळ्याला सुरुवात होताच वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विजेच्या दुर्घटनांचा धोका वाढतो. तुटलेल्या विजेच्या तारा, विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर तसेच शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी केले आहे.
महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा वेळी लोंबकळणाऱ्या किंवा तुटलेल्या तारांना स्पर्श करू नये. ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर किंवा विजेच्या खांबाजवळ शॉर्टसर्किट झाल्यास त्या परिसरात जाणे टाळून तातडीने महावितरणला माहिती द्यावी.
पावसाळ्यात घरातील ओलसर विद्युत उपकरणे, शेती पंपावरील स्विचबोर्ड तसेच उघड्या विद्युत तारा यांच्यामुळेही अपघात होऊ शकतात. त्यामुळे नागरिकांनी घर, सोसायटी आणि परिसरातील विद्युत यंत्रणा सुरक्षित असल्याची खात्री करून घ्यावी. पत्र्याच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनीही आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
महावितरणने नागरिकांना विजेच्या खांबांना जनावरे बांधू नयेत किंवा दुचाकी टेकवून ठेवू नयेत, तसेच पूरस्थितीत नदीकाठच्या भागात विशेष दक्षता घ्यावी, असेही सांगितले आहे. भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये पाणी शिरणे, झाडे कोसळणे किंवा वीज पडल्याने वीजपुरवठा खंडित होण्याबरोबरच जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, अशीही सूचना करण्यात आली आहे.
कोणतीही धोकादायक घटना आढळल्यास नागरिकांनी महावितरणच्या मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राशी १९१२ या हेल्पलाईन क्रमांकावर किंवा १८००-२१२-३४३५ व १८००-२३३-३५३४ या टोल-फ्री क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता दत्तात्रय बनसोडे यांनी केले आहे.