वाशिम: वाशिम जिल्ह्यात एकाच आठवड्यात वेगवेगळ्या ठिकाणी ३ खुनाच्या घटना घडल्या. केवळ २४ तासांत ३ खुनाच्या घटनेतील १२ आरोपींना वेगवेगळ्या जिल्ह्यातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पोलिसांनी केली. (Washim Murder Case)
पहिली खुनाची घटना ९ ऑक्टोबररोजी घडली होती. मृत दिलीप धोंडूजी सोनुने, (वय ५३, व्यवसाय शिक्षक, रा. शेलू फाटा मालेगाव, ता. मालेगाव, जि.वाशिम) यांचा आरोपींनी शेतीच्या वादातून ग्राम कोल्ही शिवारात अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देऊन खून केला होता. या प्रकरणातील आरोपी सतीश रामदास सोनुने व ज्ञानेश्वर रामदास सोनुने या दोघांना छत्रपती संभाजीनगर व हिंजवडी, पुणे येथून ताब्यात घेण्यात आले आहे. (Washim Murder Case)
दुसरी खुनाची घटना शेतीच्या मालकी हक्काच्या वादातून ११ ऑक्टोबररोजी ग्राम कार्ली शेत शिवारात घडली होती. यात गजानन उत्तम सपाटे यांचा खून झाला होता. या प्रकरणी १) नारायण सखाराम डुकरे, २) मधुकर सखाराम डुकरे, ३) किसन सखाराम डुकरे, ४) नर्मदा सखाराम डुकरे, ५) सुवर्ता मधुकर डुकरे, ६) ज्योती किसन डुकरे, ७) चंदा नारायण डुकरे या आरोपींना ग्राम कार्ली व हिंगोली येथून पोलिसांनी ताब्यात घेतले.
तिसरी खुनाची घटना अनसिंग येथील रहिवाशी शेख सलमान शेख बिस्मिला (वय २५, रा. अनसिंग) यांचा पूर्ववैमनस्यातून १३ ऑक्टोबररोजी खून केला होता. त्यानंतर त्यांचा मृतदेह पुसद तालुक्यातील ग्राम उडदी शिवारात फेकून दिला होता. या प्रकरणी १) सोहेल सलाम शहा, २) उबेर पठाण अजीस पठाण, ३) नियामत खा लियाकत खा पठाण (सर्व रा. अनसिंग) हे बाहेर राज्यात पळून जाण्याच्या तयारीत होते. त्यांना नांदेड व अकोला परिसरातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरूळपीर नीलिमा आरज यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण महल्ले, वाशिम स्थानिक गुन्हे शाखेचे तपास पथक, जऊळका, अनसिंग पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी व तपास पथकांनी केली.
हेही वाचा