वाशिम : शेतीच्या वादातून शिक्षकाचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

वाशिम : शेतीच्या वादातून शिक्षकाचा खून केल्या प्रकरणी संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

वाशिम; पुढारी वृत्तसेवा : बोरगाव येथे ड्युटीवर जात असलेल्या शिक्षकास मारहाण करून ज्वलनशील पदार्थ अंगावर टाकून पेटवून दिल्याची घटना जऊळका हद्दीत घडली होती. दि. 9 आक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेत शिक्षकाचा जागीच मृत्यू झाला होता. गुरुवारी (दि. १२) या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले. ज्ञानेश्वर रामदास सोनुने असे या संशयित आरोपीचे नाव आहे.

पो.स्टे.जऊळका हद्दीत सोमवारी (दि.९) दिलीप धोंडूजी सोनुने (वय ४५ वर्षे रा.शेलू फाटा मालेगाव, ता.मालेगाव) हे त्यांच्या मोटारसायकलने मालेगाव वरून बोरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ड्युटीवर जात होते. दरम्यान त्यांना अज्ञात आरोपींनी ग्राम कोल्ही शिवारात डोक्यावर मारहाण करून त्यांच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. यामध्ये दिलीप सोनुने यांचा वाशिम येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतकाचे भाऊ अनिल धोंडूजी सोनुने (वय ४९ वर्षे, रा.बाळखेड, ता.रिसोड) यांच्या फिर्यादीनंतर पो.स्टे.जऊळका येथे अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासादरम्यान असे आढळून आले आहे की, यातील मयत दिलीप धोंडूजी सोनुने यांचा रामदास सोनुने यांचे सोबत ग्राम बाळखेड येथील शेतीच्या मालकी हक्काबाबत वाद सुरू होता. पोलिसांनी रामदास सोनुने यांची चौकशी केली. त्यानंतर त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर रामदास सोनुने याच्यावर पोलिसांना संशय आल्याने त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणातील संशयित आरोपी म्हणून न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तांत्रिक पुरावे व मागील वादाचे वैमनस्याच्या पार्श्वभूमीवर पुढील तपास पो.स्टे.जऊळकाचे प्रभारी अधिकारी सपोनि. प्रदीपकुमार राठोड व तपास पथक करत आहेत.

Back to top button